मुंबईत रुग्णसंख्या वाढल्याने प्रशासन सतर्क

मुंबई : कोरोनाचा प्रार्दुभाव कमी झाल्याने राज्यात काही ठिकाणी निर्बंध थोड्याप्रमामात शिथील करण्यात आले आहेत. मात्र आता मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढू लागल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. महापालिकेने पुनः एकदा काटेकोर नियमांची अंमलबजावणी करणार असल्याचे जाहीर केले आहे. 

गेल्या काही दिवसात कमी झालेली नव्या कोविड रुग्णांची संख्या पुन्हा एकदा किंचित वाढते आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रस्त्यांवर आणि बाजारपेठेतही गर्दी वाढली आहे. त्यातच तिसर्‍या लाटेसंदर्भात सातत्याने इशारा देण्यात येतो आहे. या पार्श्वभूमीवर आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी अधिकार्‍यांबरोबर तातडीची बैठक घेतली. या बैठकीत कोविड नियमावलीची काटेकोर अंमलबजावणी करण्याचं ठरलं आहे. त्यानुसार आता 5 पेक्षा अधिक कोरोना रुग्ण असलेली इमारत सील करण्यात येईल. अशा इमारतींमध्ये प्रवेश करण्यास कोणालाही अनुमती असणार नाही. इमारतींमध्ये असणार्‍या कोणत्याही व्यक्तीला बाहेर पडण्यास मनाई असणार आहे. अशा इमारतींमध्ये विविध कामांसाठी येणारे कामगार, वाहन चालक यांना देखील सदर कालावधी दरम्यान इमारतीमध्ये प्रवेश असणार नाही. त्यामुळे कामवाल्या बायका, ड्रायव्हर बाहेरून येत असतील तर त्यांची सेवा बंद राहणार आहे.

इमारत सील करण्याविषयीची प्रतिबंधात्मक उपाययोजना अधिक प्रभावीपणे राबविली जावी, यासाठी सर्व सील इमारतींच्या गेटवर पोलीस बंदोबस्त ठेवण्याचे निर्देश देखील महानगरपालिका आयुक्तांनी बैठकी दरम्यान दिले आहेत. त्याचबरोबर महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याने देखील निर्धारित करण्यात आलेल्या कार्य पद्धतीनुसारच सील इमारती विषयक आवश्यक ती सर्व कार्यवाही वेळच्यावेळी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मुंबईत कोविड बधितांची संख्या किंचित वाढली असल्याने कोविड चाचणी केंद्र पुन्हा एकदा मुंबईभर सुरू करण्यात आली आहेत. 266 केंद्रावर कोविड चाचणी केली जात आहे. विना मास्क असणार्‍यांवर पुन्हा आक्रमक कारवाई करण्यात येणार आहे.