Breaking News
27 हजार लिटर बायोडिझेल जप्त; दोघांना अटक
उरण : जेएनपीटी बंदराच्या परिसरात बेकायदा बायोडिझेलची विक्री करणार्या एका लॉजिस्टिक कंपनीवर न्हावा शेवा पोलिसांनी कारवाई करीत 27 हजार 300 लिटर बायोडिझेल जप्त केले आहे. याप्रकरणी दोघांना अटकही करण्यात आली आहे. तसेच इतरही मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
जेएनपीटी परिसरात तेलाच्या बेकायदा विक्रीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरु असल्याची चर्चा आहे. यामध्ये खाद्य तेलापासून डिझेलचाही समावेश आहे. येथील टी.एल.लॉजिस्टिक कंपनीतून बायोडिझेलची विक्री केली जात असल्याची माहिती न्हावा शेवा पोलिसांना मिळालेली होती. त्यानुसार पोलिसांनी केलेल्या कारवाईत दहा लाख रुपये किमतीचे एक 15 लाख 53 हजार रुपयांचा टँकर, 2 लाख रुपये किमतीच्या लोखंडी टाक्या, 70 हजार रुपये किमतीचे डिझेल भरण्याचे यंत्र तसेच 15 लाख 50 हजार रुपयांचे बायोडिझेल जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी टँकर चालक मृत्युंजयकुमार जयशंकर पांडे व संजय बाळूभाई मशरू यांना अटक केली आहे. हा व्यवसाय करणारे दिलेश गोगरी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुजरात तसेच इतर राज्यातून तेल आणून या परिसरात त्याची विक्री केली जात आहे. जेएनपीटी परिसरात आणण्यात आलेले डिझेल हे खाद्यतेल म्हणून आणण्यात आलेले होते. या प्रकरणाचा न्हावा शेवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर भटे हे अधिक तपास करीत आहेत.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai