माथाडींना अजून 20 हजार लस देणार

देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन

नवी मुंबई : माथाडी कामगारांना विविध संस्थांकडून सीएसआर फंडातून कोरोना लसीचे 20 हजार डोस उपलब्ध करून देण्याची घोषणा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलीय. माथाडी कामगारांचे लसीकरण 25 सप्टेंबरपर्यंत सातत्याने सुरु ठेवण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या आहेत. शिवाय माथाडी कामगारांसाठी 24 तास सेवा देणारी ऍम्ब्युलन्स देण्याचे आश्वासनही फडणवीस यांनी दिलंय. नवी मुंबई एपीएमसी मार्केटमधील माथाडी भवनात आज 1 हजार माथाडी कामगारांना लसीकरणाचे उदघाटन फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. 

माथाडी कामगार नसेल तर बाजार चालणार नाही, लोक जगू शकणार नाहीत म्हणूनच माथाडी कामगारांचे कोव्हीड-19 संबंधीत लसीकरण प्राधान्याने झाले पाहिजे, यासाठी नरेंद्र पाटील यांच्या अण्णासाहेब पाटील विकास फाऊंडेशनतर्फे राबविला जाणारा माथाडी कामगारांचे मोफत लसीकरण हा उपक्रम स्तुत्य आहे. यासाठी माथाडी कामगार संघटना आणि फाऊंडेशनच्या कार्याला माझे नेहमीच सहकार्य राहिल’, असे उद्गार राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

लसीकरण कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद

बाजार समितीमधून लोकांना जीवनावश्यक वस्तू पुरवण्यासाठी माथाडी कामगार बाजारात येणे आवश्यक आहे. शिवाय बाजारातील गर्दी कमी करणे शक्य नसल्याने अशा गर्दीत माथाडी कामगारांना जीवमुठीत घेऊन काम करावे लागते. भाजीपाला आणि मसाला मार्केटमध्ये लसीकरण केंद्र सुरु करण्यात आली असली तरी शासनाकडून पुरेसा लस पुरवठा होत नसल्याने सातत्याने लस तुटवडा या ठिकाणी होत होता. त्यामुळे अनेक माथाडी कामगार लसीकरणापासून वंचित होते. परिणामी या लसीकरण कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात माथाडी कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांनी गर्दी पाहायला मिळाली. तर बाजार समिती एमआयडीसी व रेल्वे यार्ड सारख्या ठिकाणी अत्यावश्यक सेवेत राबणार्‍या माथाडी कामगारांसाठी आज सोन्याचा दिवस असल्याची भावना माथाडी कामगारांनी व्यक्त केली आहे.

या प्रसंगी आमदार गणेश नाईक, शशिकांत शिंदे, प्रसादजी लाड, निरंजन डावखरे, आमदार संदिप नाईक, माजी महापौर सागर नाईक, नवीमुंबई भाजपा जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, नगरसेविका शुभांगी पाटील, अ‍ॅड्. भारतीताई पाटील, महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे अध्यक्ष एकनाथ जाधव, कार्याध्यक्ष गुलाबराव जगताप, संयुक्त सरचिटणीस चंद्रकांत पाटील, रविकांत पाटील, दिलीप खोंड, उपाध्यक्ष सुर्यकांत पाटील, माथाडी हॉस्पीटल ट्रस्टचे मुख्य वैद्यकिय अधिकारी डॉ. हणमंतराव पाटील, बाजार समिती संचालक संजय पानसरे, मोहन गुरनानी, शंकर पिंगळे आदी मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते.