महाराष्ट्र सेंद्रिय प्रमाणीकरण यंत्रणा उभारणार

मुंबई ः राज्यांमध्ये सेंद्रिय शेती क्षेत्र मोठ्या प्रमाणावर असून त्या क्षेत्राचा विचार करता देशात महाराष्ट्र राज्याचा तिसरा क्रमांक आहे. त्यामुळे राज्य शासनाची सेंद्रिय प्रमाणीकरणाची स्वतःची यंत्रणा असणे आवश्यक आहे. त्यामुळे राज्य शासनाने महाराष्ट्र सेंद्रिय प्रमाणीकरण यंत्रणा स्थापन करण्याची मंजुरी 27 ऑगस्टच्या मंत्रिमंडळ बैठकीत दिली असून त्यासंदर्भातील अधिसूचना जारी केली आहे. 

राज्यात मागील 4-5 वर्षांपासून सेंद्रिय शेतीचे क्षेत्र वाढत आहे, परंतु प्रमाणिकरणाअभावी शेतकर्‍यांना त्यांनी उत्पादीत केलेला माल सेंद्रिय म्हणून विकता येत नाही. सद्यस्थितीत राज्यामध्ये सेंद्रिय प्रमाणीकरणाचे काम खाजगी प्रमाणीकरण संस्थांमार्फत करण्यात येते व सदरची बाब अत्यंत खर्चीक    (पान 7 वर)

असल्याने शेतकर्‍यांना प्रमाणीकरण करणे परवडणारे नाही. त्यामुळे राज्याच्या कृषी विभागाने आता पुढाकार घेऊन यासाठी राज्यात सेंद्रिय प्रमाणीकरण यंत्रणा उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार महाराष्ट्र सेंद्रिय प्रमाणीकरण यंत्रणा या संस्थेची नोंदणी, संस्था नोंदणी अधिनियम, 1860 अंतर्गत मान्यता देण्यात येत आहे. महाराष्ट्र सेंद्रिय प्रमाणीकरण यंत्रणेचे मुख्यालय महाराष्ट्र राज्य बीज प्रमाणीकरण यंत्रणा मुर्तीजापुर रोड, अकोला यांच्या उपलब्ध असलेल्या कार्यालयातील जागेतच स्थापन करण्यात येणार आहे. महाराष्ट्र सेंद्रिय प्रमाणीकरण यंत्रणेची क्षेत्रीय कार्यालय प्रत्येक कृषी विभागाकरिता एक याप्रमाणे कोल्हापूर, नागपूर, पुणे, ठाणे, औरंगाबाद, अकोला, लातूर, नाशिक येथे स्थापन करण्यात येणार आहेत. महाराष्ट्र सेंद्रिय प्रमाणीकरण यंत्रणेनेचे कार्यक्षेत्र राज्यातील सर्व जिल्हे असतील.