विकास योजना राबविण्यात कोकण विभाग राज्यात अग्रेसर

नवी मुंबई : लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकार्‍यांनी विकास योजना राबवितांना सुसंवादाचे वातावरण ठेवले तर मोठे कार्य उभे राहते. म्हणूनच कोकण विभाग शासकीय विकास योजना राबवितांना राज्यात सर्व क्षेत्रात अग्रेसर असतो. असे प्रतिपादन कोकण विभागाचे महसूल आयुक्त विलास पाटील यांनी केले. 

महा आवास अभियान-ग्रामीण अंतर्गत राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची यशस्वी अंमलबजावणी व कामगिरीबाबत मुल्यमापन करुन उत्कृष्ट काम करणार्‍या संस्था व व्यक्तींना आज कोकण भवन येथे महा आवास अभियान-ग्रामीण पुरस्कार देऊन गौरव करण्यात आले. या पुरस्कार वितरण सोहळयाच्या वेळी ते बोलत होते. 

पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन करतांना आयुक्त विलास पाटील पुढे म्हणाले की, कोकण विभागातील अधिकारी व कर्मचार्‍यांनी सकारात्मक ऊर्जा ठेवून यापुर्वीही काम केले आहे. अशीच ऊर्जा पुढेही ठेवावी. कोकण विभाग नेहमीच शासकीय योजना राबविण्याबाबत आघाडीवर असते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे कोकणातील आदर्श व सुंदर गावे आहेत. कोकणाला नेहमीच स्वच्छतेची आवड आहे. प्रशासकीय अधिकार्‍यांचे कौतुक करतांना आयुक्त म्हणाले की, विकास कामे करतांना जिल्हा परिषद, पंचायत समिती व महसूल विभागातील पदाधिकार्‍यांना मोठया आवाहनाला सामोरे जावे लागते.

सन 2020-21 या वर्षामध्ये महाराष्ट्र राज्यात 20 नोव्हेंबर, 2020 ते 5 जुन, 2021 या कालावधीत महा आवास अभियान ग्रामीण  राबविण्यात आले. अभियानात प्रधानमंत्री आवास योजनेसाठी ठाणे जिल्हयाने प्रथम क्रमांक पटकावला असून संपूर्ण अभियानादरम्यान उत्कृष्ट काम केल्याबद्दल सर्वात जास्त पारितोषिके पालघर जिल्हयाला मिळालेली आहेत. 

  • जनजागृती करा
    आगामी गणेशोत्सवाचा उत्सव लक्षात ठेवून  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सगळयांनी जागरुक राहून शासनाचे नियम पाळणे आवश्यक आहेत.  लोकप्रतिनिधींनी तळागाळापर्यंत कोरोनाबाबत जनजागृती करावी अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.