सिडकोचा प्रवर्तक विकासकांना दिलासा

नवी मुंबई ः भूखंडाकरिता अतिरिक्त चटई क्षेत्र निर्देशांक (एफएसआय) मंजूर करून घेण्याकरिता भराव्या लागणार्‍या अतिरिक्त अधिमूल्यावर प्रवर्तकांना (प्रमोटर्स) रिव्हर्स चार्ज मेकॅनिझनमचा लाभ घेता येईल असा निर्णय सिडको महामंडळाकडून घेण्यात आला आहे. सिडकोच्या या निर्णयाचे स्वागत विकसकांनी केले आहे. 

महाराष्ट्र शासनाचे एकात्मिक विकास आणि प्रोत्साहन नियमावली 2020 (युडीपीसीआर 2020) धोरण संपूर्ण नवी मुंबईसह सिडको अधिकारक्षेत्राला लागू होत असल्याने या धोरणांतर्गत भाडेपट्टाधारकाकडून अतिरिक्त अधिमूल्य आकारून, भूखंडाकरिता अतिरिक्त चटई क्षेत्र निर्देशांक मंजूर करण्याची तरतूद आहे. यानुसार सिडकोकडून नवी मुंबईमध्ये वाटप करण्यात आलेल्या भूखंडांकरिता अनुज्ञेय अतिरिक्त चटई क्षेत्र निर्देशांक मंजूर करण्याकरिता जीएसटीसह अतिरिक्त अधिमूल्य आकारण्यात येते. परंतु काही प्रवर्तक अर्जदारांनी अतिरिक्त अधिमूल्यावर जीएसटी आकारण्यात येऊ नये, याबाबतची विनंती सिडकोला केली होती. या संदर्भात सिडकोकडून जीएसटी तज्ज्ञ सल्लागारांबरोबर विचारविनिमय करण्यात आला. सदर तज्ज्ञांनी केलेल्या सूचनेनुसार, संबंधित भूखंडावर निवासी बांधकाम प्रकल्प किंवा कोणताही बांधकाम प्रकल्प विकसित करून त्याची खरेदीदारांना विक्री करू इच्छिणार्‍या प्रवर्तकाकडून अतिरिक्त चटई क्षेत्र निर्देशांकावर आकारण्यात येणार्‍या अतिरिक्त अधिमूल्यावर सिडकोला जीएसटी आकारण्याची व संकलित केलेला जीएसटी कर यंत्रणांना अदा करण्याची आवश्यकता नाही. या ऐवजी  सीजीएसटी रेट नुसार, संबंधित प्रवर्तक हे रिव्हर्स चार्ज मेकॅनिझम अंतर्गत कर भरू शकतात, अशी सूचना तज्ज्ञ सल्लागारांकडून करण्यात आली.  

रिव्हर्स चार्ज मेकॅनिझम अंतर्गत लाभ घेऊ इच्छिणार्‍या प्रवर्तक अर्जदारांनी काही बाबींची पूर्तता करणे आवश्यक आहे. अर्जदारांकडून आपण उपरोक्त जीएसटी कायद्यातील तरतुदींनुसार रिव्हर्स चार्ज मेकॅनिझमचा लाभ घेण्यास पात्र असल्याची तसेच अर्जदारांकडून रेरा अधिनियम 2016 नुसार आपण प्रवर्तक असल्याची पुष्टी करावी लागणार आहे. शिवाय अर्जदारांनी 500 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र तथा वचनपत्र सादर करून, सीजीएसटी रेट नुसार रिव्हर्स चार्ज मेकॅनिझन अंतर्गत आपण आपले जीएसटी दायित्व निभावणार असल्याबाबतचीही पुष्टी द्यावी लागणार आहे. त्यामुळे अधिकाधिक प्रवर्तकांनी रिव्हर्स चार्ज मेकॅनिझम अंतर्गत देण्यात येणार्‍या जीएसटी सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सिडकोने केले आहे. सिडकोच्या या निर्णयाचे नवी मुंबईतील सर्व विकसक संघटनांनी स्वागत केले आहे. 

बांधकाम क्षेत्रास चालना देण्याकरिता सिडको  प्रयत्नशील आहे. प्रवर्तक विकासकांना अतिरिक्त अधिमूल्यावर जीएसटी भरावा लागू नये याकरिता, जीएसटी अधिनियमाच्या अंतर्गत त्यांनी रिव्हर्स चार्ज मेकॅनिझमचा पर्याय निवडल्यास त्यांना लाभ देण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. यामुळे विकासकांवरील आर्थिक भार बर्‍याच अंशी कमी होणार आहे.
- डॉ. संजय मुखर्जी, व्यवस्थापकीय संचालक, सिडको