बाप्पाच्या स्वागतासाठी लगबग

नवी मुंबई : गणेशोत्सव तोंडावर आल्याने सर्वांनाच बाप्पाची आतूरता लागली आहे. त्याच्या स्वागतासाठी जंगी तयारी घरोघरी, सार्वजनिक मंडळांनी सुरु केली आहे. यासाठी बाजारपेठाही सुशोभीकरणाच्या वस्तूंनी, पुजेच्या साहित्यांनी, आकर्षक अशा वस्तूंनी सजल्या आहेत. काही वस्तूंचे भाव स्थिर असून काही वस्तूंमध्ये दरवाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. भक्तांचीही वस्तू खरेदीसाठी बाजारात लगबग सुरु झाली आहे.  

महाराष्ट्रात सर्वांत जल्लोषात आणि भक्तीमय वातावरणात साजरा होणारा मोठा सण म्हणजे गणेशोत्सव. हा सण आला की श्री मूर्ती पासून, मखर, हार फुले यांची किंमत नित्याने दरवर्षी वाढलेली असते. तरीही भक्तगण अगदी हौशेने, आपुलकीने, श्रद्धेने  आपला सण साजरा करतात. यंदाचा गणेशोस्तव अवघ्या एक आठवड्यावर येऊन ठेपला असून मखर, सजावट साहित्य, पूजेचे सामान खरेदीला बाजारात नागरिकांची लगबग सुरू झाली आहे. काही वस्तूंचे भाव स्थिर असून काही वस्तूंमध्ये दरवाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. बाप्पाच्या आरतीसाठी लागणारे कापूर आणि धुपाची खरेदी जास्त होत आहे. मात्र मागील वर्षी अचानक वाढलेले कापराचे आणि धुपाचे यंदा मात्र स्थिर असल्याने किमान बाप्पाच्या  आरतीचे ताट स्थिरावेल आहे.

गणेशोत्सवात बापाच्या पूजेच्या साहित्याला ही अधिक मागणी असते. पूजेच्या साहित्य बरोबरच दररोज आरती करिता कापूर, धूप नित्याने लागत असतो. मात्र मागील वर्षीपासून कापूरच्या दरात वाढ झाली आहे. आधी 400 रु ते 500 रु प्रतिकिलो मिळणारा कापूर मागच्या वर्षी हजार ते 1 हजार 200 रुपयांवर पोहोचला होता. मात्र यंदा या दरात कुठल्याही प्रकारची वाढ झाली नसून कापूर 1000 ते 1200 रु तर धूप 400 ते 600 रु प्रतिकिलो विकला जात आहे. त्यामुळे यंदा बाप्पाच्या आरतीच्या ताटाला महागाईची झळ कमी बसणार आहे.  वेगवेगळ्या शोभिवंत कंठी 40 ते 700 रुपये, लाल रुमाल 20 ते 200 रुपये, अगरबत्ती 100 ते 1000 किलो, लाकडी पाट 100 ते 1000 रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. यंदा पुजेच्या साहित्याला मागणी वाढल्याचे बाजारात पाहायला मिळत आहे. ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याने विक्रेत्यांनीही समाधान व्यक्त केले आहे.