लवकरच होणार पाणीपुरवठा सुरळीत

पाणी पुरविण्यासाठी निविदा प्रसिद्ध

पनवेल ः खारघर, कामोठे, कळंबोली व नवीन पनवेल येथील पाणीपुरवठा समस्यांबाबत तसेच भविष्यकालीन पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यासंदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांनी सूचित केल्याप्रमाणे सिडकोने दखल घेतली. त्या अनुषंगाने बुधवारी (दि. 1) सीबीडी बेलापूर येथे सिडको भवनात महत्त्वपूर्ण बैठक झाली. बैठकीनंतर दुसर्‍याच दिवशी सिडकोने पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकर भाड्याने घेण्याचा निर्णय घेतला आहे. गुरुवारी सिडकोने 365 दिवस पाणी पुरविण्यासाठी एक कोटी 41 लाख रुपयांची निविदा प्रसिद्ध करून नागरिकांना मुबलक पाणी पुरविण्याचा निर्णय घेतला आहे.

गेल्या काही दिवसांपासून खारघर, कामोठे, कळंबोली, नवीन पनवेल येथील काही विभागांमध्ये अनियमित पाणीपुरवठा होत असून नागरिकांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहेत. हा पाणीपुरवठा नियमित होण्याकरिता, तसेच भविष्यकालीन पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यासाठी सातत्याने भाजपचे नगरसेवक सिडको प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न पत्रव्यवहार व बैठकांच्या मार्फत करीत आहेत. सिडको या महत्त्वाच्या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देत नाही आणि ही वस्तुस्थिती असल्याचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी बैठकीत अधोरेखित केले.

सिडकोने बैठकीनंतर तातडीने खारघर आणि तळोजा भागात पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकर भाड्याने घेण्याचा निर्णय घेतला. बैठकीच्या दुसर्‍याच दिवशी म्हणजे गुरुवारी सिडकोने निविदा प्रसिद्ध करून बोली मागवली आहे. 356 दिवसांसाठी पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी सिडकोने टँकर भाड्याने मागविले आहेत. यासाठी सिडकोने कमीत कमी एक कोटी 41 लाख, 62 हजार 292 रुपये खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे. सिडकोने नागरिकांना दिलेल्या आश्वासनाप्रमाणे तातडीने अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे. 

  • सोसायट्यांचे लाखो रुपये वाचणार
    पाणीपुरवठा मुबलक होत नसल्यामुळे रहिवाशी सोसायट्यांना पदरचे लाखो रुपये खर्च करून पाणी विकत घ्यावे लागते. पाणीपुरवठ्याची सिडकोची जबाबदारी असताना पाणी विकत घ्यावे लागत असल्यामुळे सोसायट्यांचे बजेट कोलमडले आहे. आता सिडकोच्या टँकरने पुरवठा झाल्यास सोसायट्यांचे लाखो रुपये वाचणार आहेत.
    बैठकीच्या दुसर्‍याच दिवशी म्हणजे गुरुवारी सिडकोने निविदा प्रसिद्ध करून बोली मागवली आहे. 356 दिवसांसाठी पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी सिडकोने टँकर भाड्याने मागविले आहेत.यासाठी सिडकोने कमीत कमी एक कोटी 41 लाख, 62 हजार 292 रुपये खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे.