मलेरिया, डेंग्यू प्रतिबंधात्मक कार्यवाही वाढवा

पालिका आयुक्तांचे निर्देश

नवी मुंबई ः संपूर्ण मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रात मागील काही दिवसात विशेषत्वाने डेंग्यू आजाराच्या रूग्णसंख्येत काही प्रमाणात वाढ होत असल्याचे निदर्शनास येताच महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी आरोग्य विभागास अधिक सतर्क होऊन डासअळीनाशक तसेच डास प्रतिबंधात्मक कार्यवाही वाढविण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार डास उत्पत्ती स्थाने शोध मोहीमेसह डास अळीनाशक फवारणी व रासायनिक धुरीकरणाची कार्यवाही वाढविण्यात आली आहे.

सद्यस्थितीत अनियमितपणे पडणारा पाऊस तसेच वातावरणातील आकस्मिक बदल यामुळे सर्दी, खोकल्याच्या रूग्णांची संख्या वाढलेली दिसत आहे. सध्याच्या कोव्हीड प्रभावित काळात कोरोनाबाधितांची प्रत्यक्ष रूग्णसंख्या काहीशी मर्यादीत असली तरी कोव्हीडच्या लक्षणांशी इतर आजारांच्या लक्षणांचे साधर्म्य असल्याने महानगरपालिकेच्या वतीने कोव्हीड टेस्टींगमध्ये कोणत्याही प्रकारे घट करण्यात आलेली नाही. दैंनंदिन दररोज 7 हजारांपर्यंत टेस्टींग करण्यात येत असून कोव्हीड रूग्ण आढळतो त्याठिकाणी टारगेटेड टेस्टींग करून कोरोनाची साखळी खंडीत करण्यावर भर दिला जात आहे. त्यासोबतच मलेरिया, डेंग्यु अथवा पावसाळी कालावधीतील इतर आजार डोके वर काढू नयेत याचीही काळजी घेतली जात आहे. याकरिता दैनंदिन डास अळीनाशक फवारणी व रासायनिक धुरीकरण व्यतिरिक्त घरांतर्गत डास उत्पत्ती स्थाने शोधून नष्ट करण्यात येत आहेत तसेच आरोग्य कर्मचारी घरोघरी भेटी देवून ताप सर्वेक्षण करीत आहेत. जुलै व ऑगस्ट 2021 या दोन महिन्यांच्या कालावधीत दैनंदिन घरांतर्गत डास उत्पत्ती स्थाने शोध मोहिमेअंतर्गत एकुण 4,12,907 घरांना भेटी देण्यात आलेल्या आहेत. यामध्ये 1644 ठिकाणी घरांतर्गत डास उत्पत्ती आढळून आली आहे. त्यापैकी 695 स्थाने पूर्णपणे नष्ट करण्यात आली असून 949 स्थानांवर अळीनाशक फवारणी करुन प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आलेली आहे.  

सद्यस्थितीत अनियमितपणे पडणार्‍या पावसामुळे व वातावरणातील अनियंत्रित बदलामुळे विषाणूजन्य तापाचे रुग्ण अधिक संख्येने आढळून येत आहेत. महानगरपालिकेच्या वतीने जानेवारी ते ऑगस्ट 2021 पर्यंत एकूण 55,157 रक्त नमुने घेण्यात आले आहेत. त्यापैकी 12 हिवताप दूषित रुग्ण व 85 संशयित डेंग्युचे रुग्ण आढळले आहेत. नमुंमपा कार्यक्षेत्रात एखादा संशयित हिवताप, डेंग्यू रुग्ण आढळल्यास त्या परिसरात रुग्ण संशोधन कार्यवाही अंतर्गत आसपासच्या 100 घरांमधून घरांतर्गत डास उत्पत्ती शोधणे व रासायनिक धुरीकरण तसेच जलद ताप सर्वेक्षण करण्यात येते. त्याचप्रमाणे त्या भागातील नागरिकांना घ्यावयाच्या काळजीविषयी आरोग्य शिक्षण देण्यात येते. महापालिकेची सर्व रुग्णालये तसेच नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रे याठिकाणी तापाच्या रुग्णाची मोफत रक्त तपासणी केली जात आहे. पालिका कार्यक्षेत्रात जानेवारी ते ऑगस्ट 2021 पर्यंत डेंग्यूचे 85 संशयित रुग्ण आढळून आले असून त्यापैकी 8 रुग्णांना डेंग्यूची लागण झाल्याचे अंतिम निदान झाले आहे, त्यामुळे त्या परिसरातील 9763 घरांमध्ये पावडर फवारणी करण्यात आली व 9834 घरांमध्ये रासायनिक धुरीकरण करण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे जानेवारी ते ऑगस्ट 2021 पर्यंत हिवतापाचे 12 रुग्ण आढळून आले असून या रुग्णांच्या परिसरात 1369 घरांमध्ये पावडर फवारणी करण्यात आली व 1417 घरांमध्ये रासायनिक धुरीकरण करण्यात आले आहे.