कोविड योद्ध्यांना अर्जासाठी 1 महिन्याची मुदतवाढ

सिडको गृहनिर्माण योजनेकरिता निर्णय

नवी मुंबई ः सिडको महामंडळाच्या कोविड योद्धे आणि गणवेषधारी कर्मचारी विशेष गृहनिर्माण योजनेच्या ऑनलाइन अर्ज नोंदणीकरिता 1 महिन्याची म्हणजेच 7 ऑक्टोबर 2021 पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय सिडकोने घेतला असून या अनुषंगाने अनामत रक्कम व शुल्क भरणा, संगणकीय सोडत या प्रक्रियांनाही मुदतवाढ देण्यात आली आहे. 

कोविड-19 महासाथीच्या काळात आपल्या प्राणांची पर्वा न करता डॉक्टर, परिचारिका, वैद्यकीय कर्मचारी, पोलीस, सफाई कर्मचारी आणि अन्य अत्यावश्यक सेवांमधील कर्मचार्‍यांनी अविरपणे आपले कर्तव्य बजावले. या कोविड योद्ध्यांप्रति कृतज्ञतेची भावना म्हणून या योद्ध्यांचे हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी, महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शनाखाली सिडकोने या गृहनिर्माण या योजनेचा 15 ऑगस्ट 2021 रोजी प्रारंभ केला.  सदर गृहनिर्माण योजनेंतर्गत नवी मुंबईच्या तळोजा, कळंबोली, खारघर, घणसोली आणि द्रोणागिरी या 5 नोड्समध्ये 4,488 घरे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. इच्छुक अर्जदारांना योग्य ती कागदपत्रे जमा करण्यासाठी अर्ज नोंदणीस मुदतवाढ देण्याची मागणी संबंधितांकडून करण्यात येत होती. या बाबींचा विचार करून सिडकोने या विशेष गृहनिर्माण योजनेतील ऑनलाइन अर्ज नोंदणीसह अन्य सर्व प्रक्रियांना 1 महिन्याची म्हणजेच 7 ऑक्टोबर 2021 पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. दिलेल्या मुदतवाढीचा लाभ घेऊन अधिकाधिक कोविड योद्धे आणि गणवेषधारी कर्मचार्‍यांनी या गृहनिर्माण योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सिडकोने केले आहे. 

कोविड संबंधी कर्तव्यावर असणार्‍या कर्मचार्‍यांना योग्य ती कागदपत्रे जमा करण्यास पुरेसा अवधी मिळावा, याकरिता इच्छुक अर्जदारांच्या विनंतीस मान देऊन या विशेष गृहनिर्माण योजनेच्या अर्ज नोंदणीस 1 महिन्याची मुदतवाढ देण्यात आली आहे. अधिकाधिक कोविड योद्ध्यांना व गणवेषधारी कर्मचार्‍यांना योजनेकरिता अर्ज करता यावा व त्यांचे घराचे स्वप्न पूर्ण व्हावे याकरिता हा निर्णय घेण्यात आला आहे.  
डॉ. संजय मुखर्जी उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको