शोरुममधून लॅपटॉप चोरणारे अटकेत

नवी मुंबई : इलेक्ट्रॉनिक्स दुकानातील शोरुममध्ये डिसप्लेसाठी ठेवलेले महागडे लॅपटॉप चोरुन नेणार्‍या दोन सराईत चोरट्यांना गुन्हे शाखा युनिट-2 च्या पथकाने अटक केली आहे. त्यांनी नवी मुंबई, मुबंई व ठाणे या भागातील इलेक्ट्रॉनिक्स दुकानातून 8 लॅपटॉप चोरल्याचे निष्पन्न झाले आहे. हे सर्व लॅपटॉप व गुन्ह्यासाठी वापरलेली अल्टो कार हस्तगत करण्यात गुन्हे शाखेला यश आले आहे. 

धर्मसिंह चौथीलाल मिना (38) व आशिष कुमार रामहरी मिना (26) अशी या चोरटयांची नावे असून हे आरोपी मुळचे राजस्थान येथील असून त राजस्थान येथून कारने मुंबई, ठाणे, नवी मुंबई, नवी दिल्ली या शहरात जात असे. त्यानंतर त्या भागातील वेगवेगळ्या इलेक्ट्रॉनिक्स दुकानात लॅपटॉप खरेदी करण्याच्या बहाण्याने जाऊन डिसप्लेसाठी ठेवलेल्या ज्या लॅपटॉपला बीप पिन लावण्यात आले नाहीत, असे लॅपटॉप तेथील कर्मचर्‍यांची नजर चुकवून चोरत असे. त्यानंतर ते शर्टाच्या आतमध्ये लपवून दुकानातून बाहेर पडत होते. अशाच पद्धतीने या चोरट्यांनी गत 17 ऑगस्ट रोजी पनवेल येथील विजय सेल्स व सीबीडीतील क्रोमा इलेक्ट्रॉनिक्स शोरुममधुन 3 महागडे लॅपटॉप चोरुन नेले होते.  याबाबत पनवेल व सीबीडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हे शाखा युनिट-2 च्या पथकाने या गुह्यांचा तपास सुरु केला होता. या तपासात पनवेल आणि सीबीडीत घडलेल्या गुन्ह्याप्रमाणेच ठाणे, बोरीवली भागात देखील एकाच दिवशी एकाच पद्धतीने लॅपटॉप चोरीला गेल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. त्यानंतर गुन्हे शाखेचे पोलीस उपआयुक्त प्रविणकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने लॅपटॉप चोरी घडलेल्या सर्व घटनास्थळावरील व परिसरातील सीसीटिव्ही फुटेज व इतर तांत्रिक बाबींचा तपास केला असता, सदरचे गुन्हे हे एकाच आरोपींनी केल्याचे व सदरचे आरोपी हे राजस्थान येथील असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार गुन्हे शाखेकडून या आरोपीचा शोध घेण्यात येत असताना हे आरोपी चोरलेले लॅपटॉप विकण्यासाठी वाशी रेल्वे स्टेशन परिसरात येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा लावून धर्मसिंह मिना व आशिषकुमार मिना या दोघांना ताब्यात घेतले. त्यानंतर पोलिसांनी त्यांची अधिक चौकशी केली असता, त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी त्यांच्याकडून चोरलेले 8 लॅपटॉप व त्यांनी गुन्ह्यासाठी वापरलेली कार असा सुमारे 12 लाख 10 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या आरोपींनी पनवेल व सीबीडी, मुबंईतील बोरीवली, ठाण्यातील चितळसर मानपाडा दिल्ली येथील व निर्माण विहार पोलीस ठाण्याच्या हद्दीत केलेले लॅपटॉप चोरीचे 7 गुन्हे उघडकिस आल्याची माहिती अपर पोलीस आयुक्त महेश घुर्ये यांनी दिली.