1 लक्ष वृक्षलागवडीच्या मोहिमेला सुरुवात

नवी मुंबई - महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाच्या वतीने पावसाळी कालावधीत राज्यभरात लावण्यात येणार्‍या 13 कोटी वृक्षलागवडीच्या उद्दिष्टापैकी नवी मुंबई महानगरपालिका आपल्या क्षेत्रात 1 लाखाहून अधिक वृक्षलागवड करीत असून त्या मोहिमेचा शुभारंभ सेक्टर 26 नेरूळ येथील ज्वेल ऑफ नवी मुंबई परिसरात तसेच पावणे एमआयडीसी परिसरात गामी इंडस्ट्रियल पार्क समोरील मुख्य रस्ता दुभाजकांमध्ये मोठी वृक्षरोपे लावून करण्यात आला.

यावेळी महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी शासनाने वनमहोत्सवानिमित्त दिलेल्या उद्दिष्टापेक्षा जास्त 1 लाख 18 हजार झाडे महानगरपालिकेमार्फत नियोजनबध्द रितीने लावण्यात येत असल्याची माहिती देत त्यापैकी अमृत योजनेंतर्गत तसेच वनजमिनीवर 40 हजार वृक्षरोपे लावण्यात आली असल्याचे सांगितले. विभाग कार्यालयाच्या हद्दीत लावण्यासाठी प्रत्येक विभाग कार्यालयास 2 हजार वृक्षरोपे उपलब्ध करून दिली असल्याचे सांगत लोकप्रतिनिधी, सहकारी गृहनिर्माण संस्था, सार्वजनिक मंडळे, शाळा, महाविद्यालये, औद्योगिक संस्था, स्वयंसेवी अशासकिय संस्था, रुग्णालये यांनी आपल्या परिसरात उपलब्ध असलेल्या जागांवर वृक्ष लागवड करण्याकरीता संबंधित विभाग कार्यालयातील उद्यान सहाय्यक यांच्याशी संपर्क साधून वृक्षरोपे उपलब्ध करून घ्यावीत असे आवाहन केले. मात्र वृक्षारोपण करीत असताना नागरिकांनी पदपथांवर रहदारीला अडथळा होईल अशा ठिकाणी करू नये तसेच भविष्यात कोणत्याही प्रकारे त्रास होणार नाही अशा योग्य मोकळ्या जागांवर वृक्षारोपण करण्याची दक्षता घ्यावी व त्यांच्या संवर्धनाकडेही लक्ष द्यावे असेही आयुक्तांनी सूचित केले. वृक्षारोपणामध्ये ताम्हण, चाफा याप्रमाणेच कांचन, शंकासूर, आकाश नीम, कदंब, वड, पिंपळ, आंबा, फणस, काजू, आवळा, बदाम अशा विविध वृक्षरोपांचा समावेश आहे.