बिनडोक प्रस्तावास केराची टोपली

प्रशासनाचा मैदाने व उद्यानात संक्रमण शिबीरे बांधण्याचा प्रस्ताव महासभेने फेटाळला

नवी मुंबई ः शहरातील मैदाने, मोकळ्या जागा, बगीचे येथे धोकादायक इमारती आणि घरांच्या पुनर्बांधणीसाठी संक्रमण शिबिरे उभारण्याचा पालिका आयुक्त रामास्वामी एन व सहायक संचालक नगररचना ओवैसी मोमीन यांच्या बिनडोक प्रस्तावाला सर्वसाधारण सभेने केराची टोपली दाखवली आहे. हा प्रस्ताव  फेटाळताना पालिका सदस्यांनी प्रशासन बिल्डरांच्या तालावर नाचत असल्याचा आरोप करत या प्रस्तावाच्या हेतूबद्दलच संशय व्यक्त केला आहे.  हा प्रस्ताव   नवी मुंबईकरांच्या मुळावरच आल्याने चार तासांच्या वादळी चर्चेअंती फेटाळला.

नवी मुंबईतील सिडकोनिर्मित आणि सध्या धोकादायक स्थितीत असलेल्या इमारतींच्या पुनर्बांधणी प्रश्न अनेक वर्षे प्रलंबित आहे. त्यामुळे या इमारतीमधील रहिवाशांना जीव मुठीत घेऊन राहावे लागत आहे. पर्यायी व्यवस्था उपलब्ध नसल्याने जायचे कुठे हा यक्ष प्रश्‍न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे. अशा परिस्थितीत संक्रमण शिबीरे उभारण्याचा प्रस्ताव आयुक्तांनी तयार केला. मात्र ही संक्रमण शिबीरे शहरातील मैदाने, बगीचे तसेच मोकळ्या जागा येथे बांधण्यात येणार असल्याचे नमुद केले होते. तसेच त्यासाठी विकासकाला भाडेतत्त्वावर जागा द्याव्यात असा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. मात्र शहर सुशोभिकरणासाठी निर्माण केलेले बगीचे, नागरिकांच्या सोयीसुविधांसाठीची मैदाने व मोकळ्या जागा या संक्रमण शिबीरीसाठी योग्य नसल्याचे मत सत्ताधारी व काही विरोधी पक्षातील नगरसेवकांनी व्यक्त केले. तसेच हा प्रस्ताव कोणत्याही नगररचना अधिनियमात बसत नसल्याने सिडकोकडून जागा घेऊन ही संक्रमण शिबीरे उभारण्याच्या सूचना अनेक नगरसेवकांनी प्रशासनाला केल्या. तुर्भे येथे बंद पडलेलेल्या दगडखाणींच्या जागी किंवा एमआयडीमध्ये संक्रमण शिबीर उभारावे अशी सूचना भाजपच्या नगरसेवक रामचंद्र घरत व शिवसेनेच्या सरोज पाटील यांनी मांडली. 

तसेच सिडको निर्मित इमारतींसाठी संक्रमण शिबीरे बांधण्याचा प्रस्ताव पालिका आणते मात्र येथील भुमीपुत्र प्रकल्पग्रस्तांसाठी कोणतीच योजना किंवा धोरण आणण्यात मात्र हात आखडता का घेते? असा संतप्त सवाल प्रकल्पग्रस्त नगरसेवकांनी उपस्थित केला. 

जेएन वन व जेएन टू च्या लोकांसाठी हा प्रस्ताव आणलाय की जेएन वन व जेएन टूचे पुनर्बांधणी करण्याचे स्वप्न पाहणार्‍या विकासकासाठी आणला असा सवाल माजी महापौर सुधाकर सोनावणे यांनी उपस्थित केला. सिडकोच्या इमारतीसाठी पालिकेने संक्रमण शिबीर बांधणे चुकीच्या आहे.  जेएन वन व जेएन टूच या विकासकावरच त्यांच्या पुनर्बांधणीची व विस्थापीत रहिवाशांची जबाबदारी दिली पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले. 

कोणाच्यातरी दबावाने हा चुकीचा प्रस्ताव आणला असल्याचे दिव्या गाडकवाड म्हणाल्या. कोणत्याही जागेचा चेंज ऑफ युज करण्याचा अधिकार आपल्याला नाही. नियमानुसार चालणे गरजेचे आहे. बगीचे, मैदाने आणि मोकळ्या जागा यावर संक्रमण शिबीर बांधणे म्हणजे शासनाच्या नियमांचे उल्लंघन करणे. त्यामुळे हा प्रस्ताव चुकीचा आहे. हा प्रस्ताव नवी मुंबईकरांच्या हक्कांवर गदा आणणारा असल्याने  दिव्या गायकवाड यांच्यासह राष्ट्रवादीचे रवींद्र इथापे, सुधाकर सोनावणे व अनंत सुतार यांनी या प्रस्तावाला विरोध दर्शविला.

विकासकाच्या फायद्यासाठी हा प्रस्ताव आणला असल्याचे मत नगरसेवकांनी व्यक्त केल्यावर हा प्रस्ताव विकासकाच्या तोट्याचा असून जनतेच्या फायद्याचा कसा आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न सेनेचे नगसेवक किशोर पाटकर यांनी केला. तसेच विरोधी पक्षनेता विजय चौगुले यांनी हा प्रस्ताव फेटाळल्यास शिवसेना आंदोलन करेल असा इशारा दिला. मात्र चार तासाच्या चर्चेअंती अनेक त्रुटी असलेला हा प्रस्ताव नामंजुर करुन तो फेटाळण्यात आला.