Breaking News
सुपर मार्केटमध्ये वाईन विकण्यास राज्य सरकारची मंजुरी
मुंबई ः राज्याच्या अर्थव्यवस्थेला तसेच शेतकर्यांना प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य शासनाने सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीला परवानगी देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला आहे. या निर्णयामुळे राज्यातल्या लहान व मध्यम आकाराच्या वाईनरींना तसेच द्राक्ष व फळ उत्पादक शेतकर्यांना चांगला भाव मिळण्याची संधी उपलब्ध होणार आहे. वाईन विक्रीतून राज्याला मोठे करून उत्पादन मिळण्याचा प्राथमिक अंदाज यावेळी वर्तवण्यात आला आहे.
देशात द्राक्ष उत्पादन करणारे मोठे राज्य म्हणून महाराष्ट्राची ओळख आहे. फ्रान्समधील द्राक्षांच्या तोडीच्या तुलनेत राज्यात काही भागात द्राक्षांचे उत्पादन होते. राज्यात वाईन निर्मितीमध्ये अनेक बड्या कंपन्या कार्यरत आहेत. नाशिकमधील वाईनची कीर्ती जगभरात पोहोचली आहे. नाशिकमधील अनेक वायनरींमध्ये भरविण्यात येणार्या वाईन फेस्टिवलला पर्यटक व वाईन प्रेमींकडून मोठा प्रतिसाद मिळतो. या पार्श्वभूमीवर या उत्पादनाला चालना देण्यासाठी राज्य सरकारने नवीन धोरण बनवले असून एक हजार स्क्वेअर फूट क्षेत्रफळ असणार्या सुपर मार्केटमध्ये शोकेस तयार करून तिच्या विक्रीची परवानगी देण्यात येणार आहे. या निर्णयामुळे वाईन विक्रीच्या उद्योगाची उलाढाल एक हजार कोटी रुपयांहून अधिक होण्याचा सरकारचा प्राथमिक अंदाज असून त्यामधून राज्याचे अबकारी उत्पन्न वाढविण्याचा शासनाचा मानस आहे. यापूर्वी शासनाने परदेशातून येणार्या व आंतरराष्ट्रीय विमानतळावर विक्री होणार्या मद्यावरील अबकारी कर कमी केल्याने शंभर कोटी रुपयांनी अबकारी उत्पन्न वाढले आहे. या उद्योगाला चालना देण्यासाठी पुढील दहा वर्ष जीएसटी परताव्यातून माफी देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
राज्यात सध्या फळे, फुले, केळी व मधापासून वाईन निर्मिती करण्यात येते. वाईन निर्मिती उद्योगात असणार्या अनेक कंपन्यांना जाहिरातींवरील महागड्या खर्चामुळे त्यांच्या उत्पादनाचे मार्केटिंग करण्यात शक्य होत नाही. अशा वायनरींमध्ये तयार केलेली वाईन थेट सुपर मार्केट किंवा वॉक इन स्टोअरमध्ये शेल्फ-इन-शॉप या पद्धतीने विक्रीची मुभा दिल्यास त्याचा फायदा छोट्या वाईनरींना व राज्यातील फळ उत्पादक शेतकर्यांना मिळू शकेल असा सरकारचा विश्वास आहे. महाविकास आघाडी सरकारच्या या निर्णयाचे स्वागत फळ उत्पादक शेतकर्यांनी केले असून विरोधकांनी मात्र या निर्णयाला विरोध केला आहे. महाराष्ट्राचे रूपांतर मद्य राष्ट्रात होणार असल्याचा आरोप विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai