कडधान्य, डाळींचे दर वाढले

नवी मुंबई : माल वाहतूक दारांच्या संपामुळे अन्नधान्य आणि मसाला बाजारातील आवक घटली होती. याचा परिणाम अन्नधान्य बाजारातील कडधान्य आणि डाळींच्या दरावर झाला असून त्यात किलो मागे 8 ते 10 रुपयांची वाढ झाली आहे. 

अन्नधान्य बाजारात नेहमी 200 ते 250 गाड्या मालाची आवक होते. मात्र जसा माल शेतातून बाहेर येतो तशी आवक कमी जास्त होत असते. त्या त्या वस्तूंचा हंगाम असला की आवक वाढते .मात्र आठवडाभर चाललेल्या या संप काळात अन्नधान्य बाजारात मालाच्या केवळ 30 ते 40 गाड्या येत होत्या. या काळात बाजारात माल येण्याचे प्रमाण कमी झाले होते. त्यामुळे व्यापार्‍यांच्या गोदामात असलेला साठ्यावर परिणाम झाला आहे. 60 ते 65 रुपये किलोची मुगडाळ आता 75 ते 80 रुपये किलो झाली आहे. 50 ते 60 रुपये किलोची तुरडाळ 65 ते 70 रुपये, उडीदडाळ 52 ते 58 वरून 65 ते 70 रुपये, हरभरा डाळ 45 ते 50 रुपयांवरून 55 ते 60 रुपये किलो झाली आहे. अशीच परिस्थिती कडधान्यांची आहे. अख्खे मुग 60 ते 70 रुपये किलोवरून 70 ते 80 रुपये किलो झाले आहेत. हरभरा 45 ते 52 रुपयांवरून 60 ते 65 रुपये, हिरवा वाटाणा 70 ते 80 रुपये किलो झाला आहे. पांढरा वाटाण 50 ते 60 रुपये किलो आहे. सुके खोबरे 200 रुपये किलोवरून 220 ते 230 रुपये किलो झाले आहे. साखर 32 ते 34 वरून 40 ते 42 रुपये किलो झाल्याची माहिती व्यापार्‍यांनी दिली.