कोपरखैरणे विभाग कार्यालय कात टाकणार

नवी मुंबई ः दैनंदिन कामकाज सुरळीत व गतीमान होण्याकरीता कोपरखैरण विभाग कार्यालयाच्या इमारतीतील कार्यालयांची बैठक व्यवस्था सुनियोजित करण्यासाठी त्याचे नुतनीकरण करण्याचा निर्णय पालिका आयुक्तांनी घेतला आहे. त्यामुळे स्थायी समितीच्या मान्यतेनंतर हे विभाग कार्यालय लवकरच कात टाकणार आहे.  

नागरिकांचे महानगरपालिकेशी संबंधित काम करण्यासाठी त्यांना मुख्यालयात जावे न लागता विभाग कार्यालयातच त्यांची कामे व्हावीत यादृष्टीने महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांच्या मार्गदर्शनाखाली विभाग कार्यालयांचे सक्षमीकरण करण्यात येत आहे. आवश्यकतेनुसार विभाग कार्यालयांचे नूतनीकरण करण्यात येत आहे. कोपरखैरणे तीन टाकी येथे असलेली कोपरखैरणे विभाग कार्यालयाची तीन मजली इमारत 1998 साली सिडकोकडून महानगरपालिकेकडे हस्तांतरीत झालेली आहे. या इमारतीत तळमजल्यावर बँक असून पहिल्या मजल्यावर एका बाजूस कोपरखैरणे विभाग कार्यालय व दुसर्‍या बाजुस परिमंडळ 2 उप आयुक्तांचे कार्यालय आहे. त्याचप्रमाणे दुसर्‍या मजल्यावर एका बाजुस सिडको कार्यालय असून दुसर्‍या बाजुस पाणीपुरवठा विभागाचे कार्यालय आहे. तसेच तिसर्‍या मजल्यावर महानगरपालिकेच्या एल.बी.टी. विभागाचे कार्यालय आहे.       सद्यस्थितीत या तिन्ही मजल्यांवरील महानगरपालिकेच्या कार्यालयांची बैठक व्यवस्था सुनियोजित नसल्याने कार्यालयीन कामकाजात अडचणी निर्माण होत आहेत. या अनुषंगाने महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी विभाग कार्यालयास भेट देऊन तेथील दैनंदिन कामकाज सुरळीत व गतीमान होण्याकरीता तसेच नागरिकांनाही अडचण होणार नाही अशाप्रकारे बैठक व्यवस्थेत सुसूत्रता आणण्याच्या दृष्टीने मॉड्युलर फर्नीचरचे काम करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार तिन्ही मजल्यांवरील महानगरपालिकेच्या कार्यालयातील केबीन्स व वर्कस्टेशन्स यांची कामे करण्यात येणार आहेत. त्यासोबतच रंग रंगोटी व अनुषांगीक कामे करण्यात येणार असून स्थायी समितीच्या मान्यतेनंतर विभाग कार्यालयासह सर्वच कार्यालयांचे रुप बदलले जाणार आहे. यामुळे कार्यालयीन कामकाजात सुनियोजितता येऊन त्याचा लाभ नागरिकांनाही होणार आहे.