इंटरनॅशनल टेबल टेनिसमध्ये चमकली खारघरची कन्या

खारघर : जॉर्डनची राजधानी अम्मान येथे नुकत्याच झालेल्या ज्युनियर आणि कॅडेट ओपन या आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेत खारघरची कन्या आणि रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलची विद्यार्थीनी स्वस्तिका घोष हिने उत्कृष्ट शैलीदार खेळ करत वैयक्तिक कांस्य पदक पटकावले. तर सांघिक खेळात टीमला दुसरे सुवर्णपदक मिळवून दिलेे. या कामगिरीमुळे स्वस्तिकाच्या शिरपेचात आणखी एक यशाचा तुरा खोवला गेला आहे. स्वस्तिकाच्या यशाचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.

 इंटरनॅशनल टेबल टेनिस फेडरेनशनच्या वतीने ज्युनियर आणि कॅडेट ओपन ही स्पर्धा जॉर्डनची राजधानी अम्मान येथे 25 ते 29 जुलै रोजी झाली. या स्पर्धेत सहभागी झालेली रामशेठ ठाकूर पब्लिक स्कुलची दहाव्या इयत्तेत शिकणारी स्वस्तिका घोष हिने वैयक्तिक आणि सांघिक खेळात कर्णधार म्हणून उत्कृष्ट कामगिरी केली. चीनच्या तैपई संघाला 3-2 ने पराभूत केले तर थायलंड विरोधात 3-1 असा दणदणीत विजय प्राप्त केला. स्वस्तिकाच्या कामगिरीमुळे संघाला दुसरे सुवर्णपदक मिळाले तर तिने केलेल्या वैयक्तिक कामगिरीमुळे तिला कांस्य म्हणजेच ब्रांझ पदक देऊन सन्मानित करण्यात आले. स्वस्तिकाने यापूर्वी देश-विदेशात झालेल्या विविध स्पर्धांमध्ये उत्कृष्ट खेळ करत अनेक पदकांची लयलूट केली आहे. तिच्या यशाचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे. जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर, व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख आणि प्राचार्या राज आलोनी यांनी स्वस्तिका आणि तिचे प्रशिक्षक यांचे अभिनंदन केले आहे.