आरोग्य शिबिरासह मोफत विमा योजनेची भेट

पनवेल : दरवर्षी वाढदिवसाला दुसर्‍यांना भेट देण्याचे काम आमदार प्रशांत ठाकूर करतात. यंदा त्यांच्याकडून आरोग्य शिबिरासोबत मोफत विमा योजनेचीही आरोग्यदायी भेट पनवेल तालुक्यातील नागरिकांना मिळणार आहे. 

भाजपाचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी आरोग्य आयोजित करण्यात येते. या शिबिराचा विक्रमी संख्येत रुग्ण व नागरिक लाभ घेत असतात. यंदा महाशिबिराचे 12 वे वर्ष असून 5 ऑगस्ट रोजी खांदा कॉलनीतील सीकेटी महाविद्यालयात हे आरोग्य शिबीर होणार आहे. या शिबिरात सहभाग घेणार्‍या गरीब व गरजू रुग्णांना पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेचा लाभ देण्यात येणार आहे आणि त्याचा सर्व खर्च श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. पंतप्रधान सुरक्षा विमा योजना केंद्र सरकारतर्फे राबविण्यात येणारी व एक वर्षाचे विमा संरक्षण देणारी अपघात विमा योजना असून दोन लाख रुपयांचे विम्याचे संरक्षण देणारी हि अधिकृत सरकारी योजना आहे. 18 ते 70 वर्ष वयोगटातील प्रत्येक बचत बँक खातेदारासाठी असून याचा कालावधी 1 जून ते 31 मे असा आहे.  या योजनेचा लाभ घेण्यासाठी शिबीराला येताना आधारकार्ड, बँक बचत खाते क्रमांक, पॅन कार्ड आणणे आवश्यक आहेत. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून या योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, शहर अध्यक्ष जयंत पगडे यांनी केले आहे.