प्रियांका करतेय बॉलिवूडमध्येच शूटिंग

मुंबई : प्रियांका चोप्रानं भारत सोडला. त्याची बरीच कारणं पुढे आली. कोण म्हणालं तिला हॉलिवूडचा मोठा सिनेमा मिळाला, कोण म्हणालं निकबरोबर तिचं लग्न आहे. सलमाननं पत्रकार परिषदेत सांगितलं होतं, तिला मोठा सिनेमा मिळालाय, असं ऐकलंय. पण प्रियांकाचं खरं कारण पुढे आलंय. भारत सोडून ती दुसरा बॉलिवूडचा सिनेमा शूट करतेय. तेही फरहान अख्तरसोबत.

प्रियांका सध्या शोनाली बोसचा स्काय इज पिंक हा सिनेमा करतेय. आयशा चौधरीवर हा सिनेमा बेतलाय. असाध्य आजार झालेली आयशा ही मोटिव्हेटेड स्पीकर होती. तिच्या आईची भूमिका प्रियांका करतेय, तर वडिलांची भूमिका फरहान अख्तर करतोय. मुंबई, दिल्ली, लंडन आणि अंदमानमध्ये या सिनेमाचं शूटिंग होणार आहे.  सिद्धार्थ रॉय कपूर आणि रोनी स्क्रूवाला मिळून याची निर्मिती करतायेत.  सिनेमाला संगीत प्रीतम देणार आहे तर जुही चतुर्वेदीने संवाद लिहिले आहेत. प्रियांकानं फरहानसोबत शेवटचा सिनेमा ‘दिल धडकने दो’ केला होता.

प्रियांका चोप्रा आणखी एका हॉलिवूडपटात झळकणार आहे. क्रिस पॅटसोबत ‘काऊबॉय निंजा वायकिंग’ या सिनेमात प्रियांका काम करणार आहे असं हॉलिवूड रिपोर्टरच्या वृत्तानुसार स्पष्ट झालंय. ब्रेकिंग बॅड आणि गेम ऑफ थ्रोन्सच्या दिग्दर्शिका मिशेल मॅकलॅरन हा सिनेमा दिग्दर्शित करणार आहेत. हा हॉलिवूडचा बिग बजेट सिनेमा असेल आणि 2019 च्या जूनमध्ये प्रदर्शित होईल असं बोललं जातंय. सलमान खानसोबत भारत हा सिनेमा नाकारल्यानंतर प्रियांकाने थेट हॉलिवूडचा सिनेमा स्वीकारलाय. त्यामुळे यापुढे तिचा कल हा बॉलिवूडपेक्षा हॉलिवूडकडे असणार हे वेगळं सांगायची गरज नाही.