डुंगी ग्रामस्थांचे पुनर्वसन करा

पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे सिडकोला निर्देश

पनवेल ः नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळबाधित डुंगी गावाचे सिडकोने सध्या तात्पुरत्या स्वरूपात पुनर्वसन करावे, तसेच यासंदर्भात सेंट्रल वॉटर अ‍ॅण्ड पॉवर रिसर्च सेंटर (सीडब्ल्यूपीआरएस) यांच्याकडून अहवाल आल्यानंतर डुंगी ग्रामस्थांच्या कायमस्वरूपी पुनवर्सनासंबंधी निर्णय घ्यावा, असे निर्देश रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी मंगळवारी सिडकोला दिले. 

डुंगी गावात गेल्या महिन्यात मुसळधार पावसामुळे पाणी शिरले होते.पूरपरिस्थिती उद्भवल्याने येथील ग्रामस्थांनी सिडकोविरोधात निदर्शने केली होती. यासंदर्भात भाजप जिल्हाध्यक्ष आ.प्रशांत ठाकूर यांनी नागपूर येथे झालेल्या पावसाळी अधिवेशनात औचित्याचा मुद्दा उपस्थित करून शासनाचे लक्ष वेधले होते; तर सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा यांनी डुंगी येथे जाऊन पाहणी करीत दिलासा देण्याचे आश्वासन दिले होते. डुंगी ग्रामस्थांच्या पुनवर्सनासंदर्भात मंगळवारी मंत्रालयात रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या दालनात बैठक झाली. या बैठकीला आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे जिल्हा सरचिटणीस तथा जेएनपीटीचे विश्वस्त महेश बालदी, पनवेल तालुका उपाध्यक्ष के.ए.म्हात्रे, पारगावचे माजी सरपंच महेंद्र पाटील आदींसह सिडकोचे अधिकारी आणि डुंगी ग्रामस्थ उपस्थित होते. या वेळी झालेल्या चर्चेवेळी आमचे कायमस्वरूपी पुनर्वसन करा, अशी मागणी डुंगी ग्रामस्थांनी केली. त्यावर सीडब्ल्यूपीआरएसचा अहवाल येईपर्यंत पुनर्वसन करता येणार नाही, असे सिडको अधिकार्‍यांनी सांगितले. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यावर पालकमंत्र्यांनी सिडकोला डुंगी ग्रामस्थांचे ऑक्टोबरअखेरपर्यंत तात्पुरते आणि अहवाल आल्यावर कायमचे पुनवर्सन करा, असे निर्देश दिले.