Breaking News
नवी मुंबई ः तुर्भे झोपडपट्टी विभागातील नागरिक मागील एक वर्षांपासून पाणी टंचाईने त्रस्त आहेत. पुरेसे आणि नियमित पाणी मिळावे यासाठी माजी नगरसेवक सुरेश कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली तुर्भे स्टोअर, हनुमान नगर, आंबेडकर नगर परिसरातील झोपडपट्टीधारक 1 जुलै रोजी शिवसेना कार्यालयासमोर एकवटले. त्यांनी महापालिका प्रशासनाविरोधात घोषणाबाजी सुरु केली. सुरेश कुलकर्णी यांनी महापालिका प्रशासना विरोधात आपला तीव्र संताप व्यक्त करत ठाणे-बेलापूर महामार्ग बंद करण्याचा इशाराही दिला.
वर्षभरापासून तुर्भे स्टोअर आणि सभोवताली असणार्या सुमारे एक लाख नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. या विभागात येत असलेले अपुरे पाणीही अवेळी येत असल्याने हातावर पोट असलेल्या महिलांची दमछाक होत आहे. नवी मुंबई महापालिका एमआयडीसीला पाणी भाडे देत असताना सुध्दा एमआयडीसीकडून पाणी पुरवठा अपुरा का होत आहे? असा सवाल सुरेश कुलकर्णी यांनी अतिरिक्त शहर अभियंता अधिकारी मनोज पाटील यांच्यासमोर उपस्थित केला. येथील नागरिक प्रचंड संतप्त असून येत्या आठवड्यात तुर्भे विभागाला नियमित आणि पुरेसा पाणी पुरवठा न झाल्यास ठाणे-बेलापूर महामार्ग अडवून तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी सुरेश कुलकर्णी यांनी दिला.
दरम्यान, मोर्चेकर्यांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी महापालिकेचे अतिरिक्त शहर अभियंता मनोज पाटील यांनी आंदोलनस्थळी भेट दिली. यावेळी मोर्चेकर्यांनी अतिरिक्त शहर अभियंता अधिकारी मनोज पाटील यांना घेराव घालत तुर्भे परिसरातील जनतेला पुरेसे पाणी का मिळत नाही? याबाबत जाब विचारला. यावेळी मनोज पाटील यांनी तुर्तास तुर्भे एमआयडीसीचा पाणी पुरवठा आम्ही सुरळीत करीत आहोत. मोरबे धरणाचे पाणी झोपडपट्टी विभागाला येत्या डिसेंबरपर्यंत मिळेल, असे आश्वासन दिले. यानंतर संतप्त मोर्चेकरी शांत राहिले. सदर आंदोलनात शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, युवा नेते महेश कुलकर्णी, केशवलाल मोर्या, तय्यब पटेल, दिलीप जगताप, बाळकृष्ण खोपडे यांच्यासह तुर्भे स्टोअर, हनुमान नगर, आंबेडकर नगर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aaple Rajya News
Aajchi Navi Mumbai