सीईटीपीचे हस्तांतरण करा

एमआयडीसीचे सीईटीपीच्या अध्यक्षंाना नोटीस

पनवेल ः तळोजातील सीईटीपी चालविण्याची जबाबदारी एमआयडीसीवर देण्यास सीईटीपीने विरोध दर्शविला आहे. एमआयडीसीकडे हा प्रकल्प हस्तांतरण केल्यास कारखान्यांना महिन्याचा खर्च वाढेल, असे कारण दिले जात असले तरी उद्योगमंत्र्यांच्या आदेशाचे पालन करीत तळोजा सीईटीपी हा प्रकल्प एमआयडीसीकडे हस्तांतरीत करण्याचे आदेश दिले आहेत.

सामाजिक कार्यकर्ते महादेव वाघमारे यांनी दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन सीईटीपीचे संचालक मंडळाने केवळ भ्रष्टाचार करण्यासाठीच सीईटीपीत सुधारणा करण्यासाठी 2 ते 3 कोटी रुपयांची कामे सुरू केली आहेत, असा आरोप केला होता. त्यांच्या या आरोपाचे खंडण करीत सीईटीपीचे अध्यक्ष सतीश शेट्टी यांनी सर्व कामे कायदेशीर पद्धतीने केल्याचे म्हटले होते. सीईटीपीतील यंत्रणा सुधारण्यासाठी 74 कोटी रुपयांची कामे सुरू असताना शेट्टी यांनी सीईटीपीचे हस्तांतरण एमआयडीसीकडे करण्यास विरोध केला होता. या आरोप-प्रत्याआरोपाची दखल घेत एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता आर. पी. पाटील यांनी सीईटीपीचे अध्यक्ष सतीश शेट्टी यांना 2 ऑगस्ट रोजी पत्र पाठविले आहे. मागील काही दिवसांमध्ये सीईटीपी, तळोजा मँन्युफॅक्चरिंग असोसिएशन आणि एमआयडीसीत झालेल्या चर्चेनुसार सीईटीपीचे हस्तांतरण करण्यास हिरवा कंदील दिला होता. मात्र नव्याने अध्यक्ष झालेल्या सतीश शेट्टी यांनी या प्रक्रियेला विरोध दर्शविला होता. एवढ्यावरच न थांबता एमआयडीसीने सल्लागार समिती नेमून 74 कोटी रुपयांची कामेदेखील काढली. सरकारी अधिकार्‍यांच्या नियंत्रणाखाली ही कामे केली जावीत, असा सुभाष देसाई यांचा उद्देश आहे. मात्र शेट्टी यांनी सत्तेचा वापर करून सीईटीपीत वेगवेगळी 10 कामे करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी निविदा प्रक्रियादेखील सुरू करण्यात आली. याची दखल घेत एमआयडीसीच्या अधिकार्‍यांनी सीईटीपीच्या अध्यक्षांना नोटीस पाठवून प्रकल्प हस्तांतरण प्रक्रिया सुरू करण्याची सक्ती केली आहे, अन्यथा यापुढे कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही या पत्रात म्हटले आहे.