वाशी सेक्टर 6 चे ‘वैभव’ हरपले

3 कोटीच्या कामांची दीड वर्षात दुरावस्था ; ठेकेदारावर कारवाईची मागणी

नवी मुंबई ः वाशी प्रभाग क्रमांक 64 येथील गेली 20 वर्ष दुर्लक्षित असलेल्या पदपथांनी ऑक्टोबर 2016 मध्ये कात टाकली होती. वैभव गायकवाड व नगरसेविका दिव्या गायकवाड यांच्या संकल्पनेतून आणि पालिका प्रशासनाच्या मेहनतीतून स्मार्टसिटीत अपेक्षित असलेले सुंदर पदपथांची निर्मिती शिवाजी चौक ते सि-शोअर रस्त्याच्या दोन्ही कडेला झाली करण्यात आली. मात्र निकृष्ठ दर्जाच्या कामांमुळे केवळ दीडच वर्षात या सुशोभिकरणाची दुरावस्था झाल्याने 3 कोटी पाण्यात गेल्याची चर्चा वाशीत सुरु आहे. 

वाशी सेक्टर 6 ते शिवाजी चौक या रस्त्याला लागून असलेला सर्व्हिस रोड हा अनेक वर्ष दुर्लक्षित होता. त्याला लागून असलेला नाला गेल्या दोन ते तीन वर्षात पालिकेकडून बंदिस्त करण्यात आला होता. सिडकोच्या नोडल प्लॅनमध्ये हा भाग सायकल ट्रॅक म्हणून दाखवण्यात आला आहे. एवढी मोक्याची जागा पालिकेच्या नियोजनशुन्य कारभारामुळे अनेकवर्ष तशीच पडून होती. अनेक ठिकाणी खाजगी गाड्या उभ्या करण्यासाठी त्या जागेचा वापर करण्यात येत होता. या सर्व्हिस रोडचे सुशोभिकरणाचे काम ऑक्टोबर 2016 मध्ये पालिकेच्या माध्यमातून हाती घेतले. या सुशोभिकरणावर सूमारे 3 कोटी रुपये खर्च आला असून तेथे 93 बेंचेस बसविल्याने सूमारे 300 लोकांची बैठकीची सोय करण्यात आली होती. येथे पहिल्यांदाच पावलापावलावर कचराकुंड्या ठेवण्यात आल्या होत्या. या ट्रॅकवर 100 एलईडी बल्ब लावल्याने त्याच्या सौंर्द्यात अनोखी भर पडली. सुशोभिकरणामुळे या जागेचा कायापालट झाला व नागरिकांचे विरंगुळा स्थान म्हणून नावारुपास आले. मात्र या कामाचा दर्जा निकृष्ठ असल्याने दीडच वर्षात त्याला अवकळा आली असून येथील पदपथांच्या  लाद्या निखळले आहेत.  काही ठिकाणी पदपथ खचल्याने चालण्यास अडथळे      (पान 7 वर)

येत आहेत. कचराकुंड्या वेळेवर खाली न केल्याने अस्वच्छता पसरली आहे. नुकतेच येथे डांबरीकरण व पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी पुन्हा नव्याने काम करण्यात आल्याने सुशोभिकरण केलेल्या पदपथांची दुरदशा झाली आहे. त्यातच पालिकेने लावलेले पॅराबॉलिक कर्बस्टोनचा दर्जा अतिशय निकृष्ठ असून पावसात त्याचे आवरण निघाल्याने वर्षभरातच त्यातील खडी दिसत आहे. त्यामुळे या कामात भ्रष्टाचार झाल्याचे दिसत असतानाही अन्य लहानसहान विषयांवर महासभेत गळा काढणारे स्थानिक लोकप्रतिनिधी आवाज उठवत नसल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.