भोकरपाडा केंद्राला आय.एस.ओ. मानांकन

नवी मुंबई ः मोरबे धरणामुळे जलसमृध्द शहर अशी ओळख असणार्‍या नवी मुंबई महानगरपालिकेचे भोकरपाडा येथे स्वत:च्या मालकीचे जलशुध्दीकरण केंद्र असून त्या जलशुध्दीकरण केंद्रास आय.एस.ओ. 9001-2015 हे गुणवत्ता मानांकन मिळाले आहे. 

450 द.ल.लि. प्रतिदिन क्षमतेच्या भोकरपाडा जलशुध्दीकरण केंद्राची नवी मुंबई महानगरपालिकेने उभारणी करून ते 2012 मध्ये कार्यान्वित केले आहे. जलशुध्दीकरण केंद्रातील पाण्याची गुणवत्ता राखणे, मांडणी व कार्यप्रणाली यादृष्टीने आय.एस.ओ. 9001-2015 या प्रमाणपत्रानुसार आय.एस.ओ. च्या पथकाकडून त्यांच्या आंतरराष्ट्रीय मानकानुसार जलशुध्दीकरण केंद्रांची काटेकोर तपासणी करण्यात आली. यामध्ये या केंद्राच्या गुणवत्तेचे निरिक्षण व परिक्षणाअंती आय.एस.ओ. 9001-2015 हे गुणवत्ता विषयक मानांकन नवी मुंबई महानगरपालिकेस 2021 पर्यंत प्राप्त झाले आहे. महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी याबद्दल शहर केंद्राशी संबंधित अभियंतावर्ग व अधिकारी-कर्मचारीवृंदाचे अभिनंदन केले आहे.