परदेशात नोकरीच्या आमिषाने 16 तरूणांची फसवणूक

नवी मुंबई ः रशिया व थायलंडमध्ये काम मिळवून देण्याचे आमिष दाखवून तिघा भामट्यांनी अनेक बेरोजगार तरुणांकडून लाखोंची रक्कम उकळून पलायन केल्याची घटना उघडकीस आली आहे. नवनीत सिंग, मनदीप सिंग आणि हिरा सिंग असे या त्रिकुटाचे नाव असून गुन्हे शाखेकडून त्यांचा शोध घेण्यात येत आहे. फसवणूक झालेल्या 16 तरुणांनी आतापर्यंत पोलिसांकडे तक्रारी केल्या असल्या तरी या भामट्यांनी अनेक तरुणांची फसवणूक केली असण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

आरोपी त्रिकुटाने खारघर सेक्टर 3मधील युगंधा कॉम्प्लेक्समध्ये आयसीएस टेक्नॉलॉजीज या नावाने कार्यालय थाटले होते. त्यानंतर या त्रिकुटाने रशिया व थायलंड देशामध्ये फर्निचर, प्लंबर, इलेक्ट्रिक व अन्य कामांसाठी मुले पाहिजे असल्याची जाहिरातबाजी केली होती. त्यामुळे विविध भागांत रहाणारे फर्निचर, प्लम्बिंग, इलेक्ट्रिक, वेल्डिंग तसेच अन्य प्रकारची कामे करणार्‍या तरुणांनी मे महिन्यामध्ये खारघर येथील कार्यालयात संपर्क साधला होता. त्यावेळी या त्रिकुटाने महिन्याला 50 हजार रुपये पगार मिळेल, असे आश्वासन दिले होते. त्यानंतर त्रिकुटाने प्रत्येक तरुणाची मुलाखत घेण्याचा तसेच त्यांची वैद्यकीय चाचणी करण्याचा बहाणा करून त्यांना परदेशात जाण्यासाठी लागणारा व्हिसा मिळविण्यासाठी रोख रक्कम लागणार असल्याचे सांगून त्यांच्याकडून 10 हजारांपासून ते 50 हजारांपर्यंतची रक्कम उकळली. त्यानंतर या त्रिकुटाने त्यांना बनावट व्हिसा दिला. काही तरुणांनी इंटरनेटच्या माध्यमातून या व्हिसाची तपासणी केली असता, हा व्हिसा बनावट असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे खारघर येथील कार्यालयात जाऊन विचारणा केली. यावेळी त्रिकुटाने उर्वरित 40 हजार रुपये आल्यानंतरच त्यांना खरा व्हिसा देण्यात येणार असल्याचे तसेच त्यांना लवकरच परदेशात कामाला पाठविणार असल्याचे सांगून वेळ मारून नेली. मात्र दोन दिवसांनंतर हे तरुण पुन्हा खारघर येथील कार्यालयात गेले असता, तिघांनी कार्यालय बंद करून पलायन केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे फसवणूक झालेल्या तरुणांनी गुन्हे शाखेकडे लेखी तक्रार दाखल केली होती. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.