Breaking News
सेनेसाठी सुषमा अंधारेंनी कसली कंबर
नवी मुंबई ः शिवसेनेतील बंडखोरी, केंद्रिय निवडणुक आयोगाने गोठवलेले पक्षाचे नाव व चिन्ह यामुळे पक्षाच्या अस्तित्वाविषयी मोठा अंधकार शिवसैनिकात पसरला आहे. शिवसेनेच्या उभारीसाठी सुषमा अंधारेंनी कंबर कसली असून गुरुवारी वाशीत झालेल्या प्रबोधन मेळाव्यात त्यांनी तेजस्वी भाषणाद्वारे उपस्थित हजारो शिवसैनिकांत नवचैतन्य फुलवले आहे. सुषमा अंधारे यांच्या फायर बँ्रड भाषणाने आणि पक्षाला मिळालेल्या मशाल या चिन्हामुळे शिवसेनेतील निराशेचा अंधकार दूर होवून ती नव्या जोमाने उभी राहिल असा विश्वास शिवसैनिकांनी व्यक्त केला.
गुरुवारी वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात नवी मुंबई शिवसेनेच्यावतीने प्रबोधन यात्रेद्वारे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला खा. अरविंद सावंत, खा. राजन विचारे, सुषमा अंधारेंसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. शिवसेनेचे नाव आणि चिन्ह गोठवल्यानंतर शिवसैनिकांत पसरेल्या पक्षाच्या भवितव्याविषयीचा अंधकार दूर करण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात महाप्रबोधन यात्रा काढण्याचे जाहीर करुन त्याची सुरुवात ठाण्यातून केली. ठाण्यामध्ये शिवसेनेच्या फायर बँ्रड नेत्या सुषमा अंधारे यांनी केलेल्या भाषणामुळे त्या महाराष्ट्रात घरोघरी पोहचल्या असून त्यांचे भाषण ऐकण्यासाठी शिवसैनिकांनी गुरुवारी वाशीतील भावे नाट्यगृहात प्रचंड गर्दी केली होती. यावेळी बोलताना त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर घणाघाती टिका करत भाजपाकडून भारतीय संविधानाची चौकट उध्वस्त केली जात असल्याचा आरोप केला. शिवसैनिकांवर शिंदे-फडणवीस सरकारकडून कशापद्धतीने खोट्या केसेस दाखल केल्या जात आहेत आणि पक्षांतर न करणार्यांना तडीपारीच्या नोटासा बजावल्या जात असल्याचे सांगितले. यावेळी खा. अरविंद सावंत यांनी धर्मवीर आनंद दिघे यांचे नाव घेण्याची लायकी गद्दारांची नसल्याचे सांगत शिवसेनेला संपवण्याचे कारस्थान करणार्या भाजपच्या मांडीला मांडी लावून गद्दार बसले असल्याचा आरोप त्यांनी शिंदे यांच्यावर केला. उद्धव ठाकरे यांनी संयम पाळला असल्याने महाराष्ट्र शांत आहे नाहीतर गद्दारांना पळता भुई थोडी झाली असती असा इशारा त्यांनी दिला.
शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी केलेल्या भाषणानंतर शिवसैनिकांत त्यांच्याच नावाची के्रझ निर्माण झाली आहे. सध्या संजय राऊत कोठडीत असल्याने त्यांची भुमिका सुषमा अंधारे व्यवस्थित पार पाडत असून त्यांच्या भाषणामुळे शिवसैनिकांत नवचैतन्य निर्माण झाल्याचे दिसत आहे. पक्षाला मिळालेले मशाल हे चिन्ह आणि अंधारे यांच्या मुद्देसुद भाषणाने शिवसेनेत पसरलेली निराशा आणि अंधकार दूर होईल अशी अपेक्षा उपस्थित शिवसैनिकांनी व्यक्त केली.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai