वडघरची 20 हेक्टर जमीन निवासी वापरासाठी

नवी मुंबई ः सिडकोच्या विकास आराखड्यातील पनवेल येथील मौजे वडघरमधील 20 हेक्टर जमीन निवासी वापरासाठी प्रस्तावित केली आहे. त्यासाठी महाराष्ट्र शासनाने 2 ऑगस्ट 2018 रोजी याबाबतची अधिसूचना जारी केली असून नागरिकांकडून सूचना व हरकती मागवल्या आहेत. 

1980 च्या विकास आराखड्यात मौजे वडघर आणि करंजाडे गावाच्या पायथ्याशी असलेली सूमारे 116 हेक्टर जमीन प्रादेशिक उद्यान या वापर विभागात समाविष्ट केली आहे. निवासी वापरासाठी तसेच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळबाधित प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी सिडकोला निवासी वापराच्या जमीनीची कमतरता भासत असल्याने सिडकोने 30 एप्रिल 2015 रोजी 116 हेक्टर जमीन निवासी वापराच्या उद्देश बदलासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवला होता. त्यापैकी निदान 20 हेक्टर जमीनीचा प्रस्ताव प्राधान्याने मंजुर करण्यासाठी सिडको प्राधिकरणाने 20 नोव्हेंबर 2017 रोजी शासनास विनंती केली. सिडकोच्या या विनंतीला प्रतिसाद देत शासनाने 2 ऑगस्ट 2018 रोजी सिडकोच्या विकास नियंत्रण नियमावलीतील फेरबदलासाठी अधिसूचना जारी केली आहे. या अधिसूचनेच्या अनुषंगाने मौैजे वडघर तालुका पनवेल येथील 20 हेक्टर जमीन प्रादेशिक उद्यान विभागातून वगळून ती रहिवासी विभागात समाविष्ट केली आहे. याबाबत बाधित नागरिकांकडून सूचना व हरकती मागविल्या असून त्या व्यवस्थापकीय संचालक सिडको, सहसंचालक नगररचना, कोंकण भवन व सहाय्यक संचालक नगररचना अलिबाग शाखा, जिल्हा रायगड येथे एक महिन्यात सादर करायच्या आहेत. यावापर बदलामुळेे सिडकोला रहिवाशी वापरासाठी अधिक उपलब्ध झाल्याने विमानतळ प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन लवकर मार्गी लागण्याची शक्यता आहे.