नवी मुंबई निवासयोग्य शहर

111 शहरांमधून पटकावले दुसरे स्थान

नवी मुंबई ः केंद्रीय गृहनिर्माण व शहरी विकास मंत्रालयाच्या वतीने 10 लाखापेक्षा अधिक लोकसंख्या असणार्‍या देशातील 111 शहरांचे जीवनमान निर्देशांकाची तपासणी केली. यामध्ये नवी मुंबई शहर हे देशातील दुसर्‍या क्रमांकाचे निवासयोग्य शहर म्हणून भारत सरकारमार्फत जाहीर करण्यात आले आहे. 

संपूर्ण देशभरात झपाट्याने नागरीकरण होत असताना वाढत्या शहरांच्या गरजा संबंधित महापालिका प्रशासनामार्फत योग्य रितीने पुरविण्यात येत आहेत काय? या अनुषंगाने केंद्र सरकारमार्फत देशातील 111 शहरांची जीवनमान निर्देशांक तपासणी करण्यात आली. त्यामध्ये फिजिकल, इन्स्टिट्युशनल, सोशल आणि इकॉनॉमिकल अशा चार मुख्य निकषांच्या अनुषंगाने तपासणी करण्यात आली. या चार निकषांमधील इन्स्टिट्युशनल निकषात गव्हर्नन्स, डमिनिस्ट्रेशन, ऑनलाईन सर्व्हिसेस यामध्ये सर्वाधिक गुण प्राप्त होऊन देशातील सर्वोत्तम प्रशासन प्रणाली राबविणारे शहर म्हणून नवी मुंबई महानगरपालिका प्रथम क्रमांकाचे शहर ठरले. यामध्ये जनतेला लाभदायक प्रशासकिय सेवा पुरविणे, माहिती तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून संगणकीय प्रणालीचा जास्तीत जास्त उपयोग करून घेणे, तक्रार निवारण प्रणाली नागरिकांना समाधानकारक अशा कालमर्यादित पध्दतीने राबविणे अशा विविध गोष्टींचे परीक्षण करण्यात आले. यामध्ये नवी मुंबई महानगरपालिका देशातील 111 शहरांमध्ये सर्वोत्तम ठरली. 

फिजिकल निकषात गृहनिर्माण, मोकळ्या जागा, उर्जास्त्रोत, पाणीपुरवठा अशा बाबींचा समावेश होता. तसेच सोशल निकषात शिक्षण व आरोग्य त्याचप्रमाणे इकोनॉमिकल निकषात अर्थकारण व रोजगार अशा बाबींचा समावेश होता. या चार निकषांच्या अनुषंगाने देशातील 111 शहरांचे परीक्षण करण्यात आले. साधारणत: 4 महिने केंद्र सरकारच्या परीक्षण समितीमार्फत कागदपत्रे तपासणी व प्रत्यक्ष भेटी याव्दारे परीक्षण करण्यात आले. यामध्ये नवी मुंबई महानगरपालिका 58.02 गुणांकन प्राप्त करून देशातील व्दितीय क्रमांकाचे निवासयोग्य शहर म्हणून मानांकित ठरले. या क्रमवारीत नवी मुंबई महानगरपालिकेपेक्षा केवळ 0.09 गुणांनी पुणे हे शहर पुढे आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेचा हा राष्ट्रीय स्तरावर झालेला आणखी एक सन्मान शहराचा नावलौकीक उंचाविणारा असून यापुढील काळात शहरातील जीवनमानाचा स्तर उंचाविण्यासाठी पुरविण्यात येणार्‍या सुविधांचा दर्जा उत्तम राखण्यासाठी अधिक काटेकोर प्रयत्न केले जाणार आहेत.