मुत्सद्देगिरीचा वस्तुपाठ

राजकारणातील एक पर्व व्यापून उरणारे अटलबिहारी वाजपेयी अलिकडे सक्रिय नसले तरी त्यांचं अस्तित्वच अनेकांसाठी आशादायी होतं. शांत आणि संयमी राजकारणी कसा असावा याचं उदाहरण देताना अंगुलीनिर्देश करता येईल असं हे एक स्थान होतं. एखादी व्यक्ती उत्तम साहित्यिक, कवी, वक्ता, संसदपटू, विरोधी पक्षनेता असा लौकिक किती सहजतेने सांभाळू शकते याचा ते वस्तुपाठ होते. अशा महनीय नेत्याला विनम्र आदरांजली.


भारतभूमीने अनेक सुपूत्रांना जन्म दिला आहे. कलागुणांनी युक्त अशी अनेक महनीय व्यक्तिमत्त्वं या भूमीने पाहिली आहेत. जगाच्या पाठीवर तिची वेगळी ओळख मिळवून देण्यात या व्यक्तींचा मोलाचा हातभार लाभलेला आहे. त्यापैकीच एक नाव म्हणजे अटलबिहारी वाजपेयी. राजकारणाला वेगळा आयाम, वेगळी संवेदनशीलता, वेगळी प्रगल्भता आणि वेगळा विचार देणारा हा नेता जनतेच्या मनोविश्‍वावर अधिराज्य गाजवणारा होता. देशकार्याला समर्पित असं त्यांचं आयुष्य अनेकांचा प्रेरणास्त्रोत होतं. वार्धक्यामुळे गेली काही वर्षं राजकारणातून दूर असले तरी त्यांची प्रतिमा डोळ्यासमोर होती. पण मृत्यूच्या बातमीमुळे जनसामान्यांचा हा आधार कोलमडून पडला आहे. जनांचा संवेदनशील आणि शिस्तप्रिय नेता हरपल्याची सार्वत्रिक भावना देशभर पसरली आहे. एक विवेकशील नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेलं आहे.

 राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक म्हणून कारकीर्द सुरु करणारे अटलजी या देशाचे पंतप्रधान होतील हे खरं वाटलं नव्हतं. पण ते पंतप्रधान झाले. त्यांनी भारतीय जनसंघ या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या राष्ट्रीय पातळीवरील राजकीय विचारमंचाची स्थापना करण्यात बराच पुढाकार घेतला होता. पदव्युत्तर शिक्षण घेतलेले अटलबिहारी वाजपेयी मूळ उत्तर प्रदेशचे... एका साध्या शिक्षकाचे पुत्र होते. मध्यमवर्गीय एकत्र कुटुंबात त्यांचं पालनपोषण झालं. या नेत्यांचं अवघं जीवन  मध्यमवर्गीय स्वरुपाचंच होतं. ज्या जनसंघाची स्थापना करण्यात त्यांनी पुढाकार घेतला त्याचे ते अध्यक्ष झाले. संसदेत निवडून आले. एक उत्तम संसदपटू म्हणून त्यांनी लौकिक संपादन केला. खुद्द पं. जवाहरलाल नेहरु यांच्यासार‘या नेत्यानं अटलजींच्या वक्तृत्वशैलीचं भरभरुन कौतुक केलं होतं. तरीही जनसंघाची वा ज्या जनता पक्षात जनसंघाचं विलनीकरण झालं त्याची संसदेतील 150 च्या आसपास जागा जिंकून राष्ट्रीय लोकशाही आघाडी स्थापन करुन सत्तेत येण्याएवढी क्षमता निर्माण होईल हे कधीही शक्य वाटलं नव्हतं. पण ते घडलं आणि हा पक्ष इतर पक्षांची मदत घेऊन सत्तेत आला. अटलबिहारी वाजपेयी नावाचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा एक स्वयंसेवक पाहता पाहता प्रचारक, मग त्याच विचारसरणीच्या राजकीय विभागाचा जनसंघाचा एक संस्थापक, त्याच पक्षाचा अध्यक्ष, नंतर संसद सदस्य, विरोधी पक्ष नेता, अखिल भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष असा मजल दरमजल प्रवास करत देशाच्या सर्वोच्चपदी विराजमान झाला.

अटलजी अविवाहित होते. त्यामुळे त्यांना कुटुंबाचा पाश नव्हता. एक उत्तम साहित्यिक, कवी, वक्ता, संसदपटू, विरोधी पक्षनेता असा त्यांचा लौकिक कायम राहिला. पण पंतप्रधानपदी विराजमान झाल्यावर त्यांच्यातील आणखी एक महत्त्वाचा गुण प्रकर्षानं जाणवला तो म्हणजे मुत्सद्दीपणाचा आणि राजनीतीज्ज्ञ असण्याचा... ते  नेहमीच निश्‍चयी वाटत असत. नर्म विनोद करत विरोधकांची खिल्ली उडवणारे वाजपेयी वेळ आल्यावर खूप ठामपणे वागत असत. त्या ठामपणात मुत्सद्देगिरी, राजनीतीज्ज्ञता असा प्रकार अधिक असल्याचं जाणवता असे.  पाकिस्तानी अतिरेक्यांनी संसदेवर केलेल्या हल्ल्यानंतर आता पाकिस्तानची ‘खैर’ नाही असं म्हणून ‘काँटे की लडाई होगी, आरपार की लडाई होगी’ म्हणणारे अटलजी एकदम लढाईऐवजी मुत्सद्देगिरीच्या मार्गानं पाकिस्तानला नामोहरम करण्याच्या मनस्थितीत आल्याचा  अनुभव देशवासियांनी घेतला आहे. त्या सार्‍या प्रकारांमुळेच त्यांचा भावभावनांचा खेळ नव्हे तर राजनीतीज्ज्ञाचा मुत्सद्देगिरीचा स्वभावही जनसामान्यांना परिचित आहे. त्यांनी आपल्या या गुणवैशिष्ट्यानेच संसद भवनावरील हल्ल्याला बराच काळ उलटून गेला तरी परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यात यश मिळालं. त्यावेळी नेतृत्व इतकं प्रबळ नसतं तर परिस्थिती चिघळण्यास वेळ लागला नसता. परिस्थिती आपल्या बाजूने रहावी यासाठी अमेरिकी आणि ब्रिटिश नेत्यांशी बोलणी करण्याचा अटलजींनी लावलेला सपाटा हादेखील जागतिक स्तरावरील कौतुकाचा विषय ठरला. 

त्याचबरोबर नेपाळमधील सार्क परिषदेत वा अन्यत्रही पाक नेत्यांशी कोणत्याही प्रकारचा संपर्क ठेवायचा नाही, या भूमिकेविषयीही वाजपेयी आणि त्यांचे सरकार ठाम राहिलं. तो त्यांच्या मुत्सद्देगिरीच्या धोरणाचा हा एक महत्त्वाचा भाग ठरला. समझोता रेल्वे आणि दिल्ली-लाहोर बस सेवा रद्द करणं याबाबतही त्यांचं सरकार ठाम होतं. संघ परिवारातील विश्‍व हिंदू परिषदेने राम मंदिर उभारणीचा प्रश्‍न धसाला लावण्याचा प्रयत्न करताच त्यांना ‘ही वेळ योग्य नाही’, असा सल्ला देऊन त्या संघटनेच्या नेत्यांची कानउघाडणी करायलाही अटलबिहारी वाजपेयी डगमगले नाहीत. तोच प्रकार दत्तोपंत ठेंगडी यांच्यासार‘या ज्येष्ठ भाजप नेत्याबाबत घडल्याचं वाचकांच्या स्मरणात असेल. ‘हे सरकार ढोंगी तरी आहे किंवा अज्ञानी तरी आहे’ असं ते म्हणाले असता अटलजींनी या विधानाची दखल न घेता दुर्लक्ष करणंच पसंत केलं. हाही त्यांच्या मुत्सद्देगिरीचा-राजनीतीमधील परिपक्वतेचाच भाग म्हणायला हवा. अटलजी हे साहित्यिक, कवी, पत्रकार, राजकारणी होते त्याचप्रमाणे मुत्सद्दी राजनीतीज्ज्ञही होते हे अशाप्रकारे वारंवार सिध्द झालं.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख गोळवलकर गुरुजी, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी, दीनदयाळ उपाध्याय, यग्यदत्त शर्मा, जगन्नाथराव जोशी, मोरोपंत पिंगळे अशा अनेक मान्यवरांकडून तालीम घेणारे अटलजी स्वाभाविकच त्यांच्या विचारांनी प्रभावित होते. जनसंघाचे मान्यवर नेते प्रा.बलराज मधोक वा डॉ.एम.एल.सोधी यांच्यावर मात करुन पक्षात टिकून राहण्याची किमयाही त्यांनी करुन दाखवली. बरोबरीच्या अनेक समवयस्क मंडळींवर मात करत वाजपेयी पंतप्रधानपदी पोहोचले. हे सारं साधण्यासाठी काही विशेष कौशल्य असावंच लागतं. विशेषत: राष्ट्रीय स्तरावर नेतृत्व टिकवून धरण्यासाठी नाना प्रकारच्या ‘कळा’ अंगी असाव्या लागतात. त्या त्यांच्या अंगी होत्या यात शंका नाही. मुख्य विरोधी पक्ष असणार्‍या काँग्रेसचा विरोध न जुमानता त्यांनी जॉर्ज ङ्गर्नांडिस यांच्याविरुध्दच्या भ्रष्टाचाराबाबतच्या आरोपांची चौकशी पूर्ण होण्यापूर्वीच संरक्षणमंत्रीपदी नेमणूक केली. विरोधकांच्या विरोधाला कधी मान द्यायचा आणि त्याच विरोधकांच्या विरोधावर कधी मात करायची त्याचीही जाण अटलजींना उत्तम असल्याचं यावरुन स्पष्ट होतं. ममता बॅनर्जी आणि जयललिता या दोन्ही सम्राज्ञींचे लाड करता करता त्यांनी त्या दोघींनाही आपल्या मुत्सद्देगिरीनं अशी काही चपराक दिली की त्या बिचार्‍या जागच्या जागीच थिजून गेल्या. हेच खर्‍या मुत्सद्याचं लक्षण असतं. कल्याणसिंग यांना भुईसपाट करण्यातही अटलजींनी यश मिळवलं होतं.  असाच काहीसा प्रकार बंगारु लक्ष्मण या नेत्याविषयी झाला. जॉर्ज ङ्गर्नांडिस चौकशीपूर्वी आणि निर्दोष ठरण्याआधीच पुन्हा मंत्रीपदी नेमले जातात तर मग बंगारु लक्ष्मण या दलित नेत्याला भाजपच्या अध्यक्षपदी चौकशी पूर्ण होण्यापूर्वीच नेमायला काय हरकत आहे? असा प्रश्‍न उपस्थित केला गेला. परंतु जॉर्ज यांची नेमणूक करणं आणि बंगारु लक्ष्मण यांची नेमणूक न करणं या दोन्ही निर्णयांमध्ये त्यांची मुत्सद्देगिरीच जिंकली. पाकिस्तानला निमंत्रण देणं, ‘आपण आपल्या परीनं सारं काही करुन पाहिलं आहे बघा’ असाच संदेश सार्‍या जगाला देणं हीदेखील अटलजींचीच मुत्सद्देगिरीच होती.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आणि भारतीय जनता पक्षाचेही एक मान्यवर नेते गोविंदाचार्य विरोधात बोलायचे. अशा वेळी एक-दोन वेळा त्यांना समजावून पाहणं आणि बदलत नाहीत हे पाहताक्षणीच त्यांच्याकडे दुर्लक्ष करणं यालाही मुत्सद्देगिरीच म्हणायला हवी. प्रत्येक राजकीय नेत्याला स्वत:च्या अस्तित्वरक्षणासाठी अशा मुत्सद्देगिरीची तीव्र आवश्यकता असते. त्यामुळे बलराज मधोक, मोहनलाल सोंधी, कल्याणसिंग, बंगारु लक्ष्मण, गोविंदाचार्य, जयललिता, ममता बॅनर्जी आदी विरोधक बाजूला टाकू शकणारे अटलबिहारी वाजपेयी हे केवळ साहित्यिक, कवी, संघटक, प्रचारक, तत्त्ववेत्ते नव्हते तर मुरलेले राजकारणी होते हे आपण लक्षात घ्यायला हवं. वरपांगी शांत, हसतमुख, संयमी वाटणार्‍या वाजपेयींना नेपाळमधील काठमांडू या ठिकाणी पार पडलेल्या सार्क परिषदेत जनरल परवेझ मुशर्रङ्ग यांच्याशी हस्तांदोलन करताना पाहिलेलं आठवत असणार्‍यांच्या एक गोष्ट प्रकर्षानं लक्षात आली असेल तर की त्यावेळीही त्यांची एकदा बिघडलं की बिघडलं. मग कशाचीही ङ्गारशी पर्वा करणार नाही असाच बेदरकारपणा होता. अर्थात मुत्सद्दीपणात थोडासा लवचिकपणाही असावा लागतो. वेळ पडली की अटलजींनी तोदेखील दाखवला आहे. अशा या महान नेत्याने जगाचा निरोप घेणं ही अत्यंत दुखद बाब आहे. अटलजींना विनम‘ आदरांजली.