कामगारांवर घड्याळाचा वॉच

कामचुकारगिरीला बसणार वेसण 

नवी मुंबई महापालिकेचा प्रस्ताव

नवी मुंबई ः कामावर आल्यावर अर्ध्यातून निघून जाणे, स्वत: न येता दुसर्‍यालाच रोजंदारीवर पाठवून महापालिकेचा पगार लाटणे असे प्रकार महापालिकेच्या विविध खात्यांतील कंत्राटी कामगारांकडून होत आहेत. पालिका आयुक्त एन. रामास्वामी यांच्या निदर्शनास ही बाबा आल्यावर त्यांनी महापालिकेतील अशा सुमारे सहा हजार कंत्राटी कामगारांवर वॉच ठेवण्यासाठी जिओ फेन्सिंग आणि टॅगिंग’चा पर्याय शोधला आहे. यामुळे कर्मचार्‍यांच्या कामचुकारगिरीला चाप बसणार आहे. 

नवी मुंबई महापालिकेत साफसफाईसह पाणीपुरवठा, मलनि:सारण, इलेक्ट्रिकल खात्यात कंत्राटी पद्धतीवर सुमारे सहा हजार कामगार आहेत. अनेकदा ते ठेकेदार, महापालिकेचे पर्यवेक्षक, स्वच्छता निरीक्षक, स्वच्छता अधिकारी आणि काही वेळेला स्थानिक नगरसवेकांशी हातमिळणी करून काम न करताच महापालिकेचा पगार लाटतात. महापालिकेत असलेल्या बायोमेट्रिक मशिनचीही ते नासधूस करत असल्याने नक्की हजेरी समजत नाही. हे टाळण्यासाठी हा ‘जिओ फेन्सिंग आणि टॅगिंग’चा पर्याय आयुक्तांनी शोधला आहे. ‘जिओ फेन्सिंग आणि टॅगिंग’ हे भारत सरकारच्या मालकीच्या इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने निर्मित केलेले जीपीएसवर आधारित एक घड्याळ असून ते हातात बांधल्यानंतर संबंधित कामगार कामावर किती वाजता आला, तो कोणत्या कोणत्या क्षेत्रात फिरला, किती वेळ फिरला, किती वेळ बसून होता, दिलेल्या कामाच्या परीघाबाहेर तो किती वाजता व किती वेळ गेला हे सारे कळणार आहे. या घड्याळाची किंमत नाममात्र असून महापालिका ती भाड्याने घेणार असल्याने खर्चातही बचत होणार आहे. शिवाय हे घड्याळ ज्याच्या नावाने आहे त्याला दुसर्‍याला देता येणार नाही. यामुळे प्रॉक्सी कामगार पाठविणार्‍यांना वेसण बसणार आहे. विशेष म्हणजे, हे घड्याळ तोडता येणार नसल्याने कामगारांनी नक्की काम किती केले, किती वाजता ते सुरू केले, हेसुद्धा समजणार असून ही घड्याळे कंत्राटी कामगारांबरोबरच पर्यवेक्षक, स्वच्छता निरीक्षक यांच्या हातात बांधले जाणार आहे. याचे मॉनिटरिंग डॅशबोर्डच्या माध्यमातून महापालिका आयुक्त, उपायुक्त, स्वच्छता अधिकारी हे आपल्या दालनातूनही करू शकणार असल्याची माहिती शहर अभियंता मोहन डगांवकर यांनी दिली. महासभेच्या मंजुरीनंतर या प्रस्तावाची अंमलबजावणी होणार आहे.