आरोग्य सेवेचे सक्षमीकरण होणार

सी.पी.एस. अभ्यासक्रमातून 40 हून अधिक डॉक्टर्स उपलब्धते

नवी मुंबई ः महानगरपालिकेच्या रुग्णालयामध्ये सी.पी.एस.पदवी, पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. यामुळे आरोग्य विभागासाठी 46 डॉक्टर्स उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे पालिकेच्या आरोग्य सेवेचे सक्षमीकरण होऊन शहरातील नागरिकांना योग्य आरोग्यसेवा देता येणार आहेत. 

नागरिकांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या अशा आरोग्य सेवेकडे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता जाणून येथील डॉक्टरांची कमतरता दूर होण्याकरिता सी.पी.एस. अभ्यासक्रम सुरू करण्याचे ठरविले आणि यामध्ये शासनाचे संबंधित अधिकारी यांनी मोलाचे सहकार्य केल्यामुळेच अत्यंत अल्प कालावधीत याचे उद्घाटन होत असल्याचे आयुक्त रामास्वामी एन. यांनी सांगितले. महानगरपालिका रूग्णालयांकरिता उपलब्ध होणार्‍या या डॅाक्टरांना मुंबईसारख्या ठिकाणी प्रतिमाह रु. 15 हजार इतकी मानधन रक्कम दिली जाते, ती आपण 25 हजार इतकी देत असून यामधून गुणात्मक दर्जेदार सेवा अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले. विविध 11 विभागांमध्ये हा अभ्यासक्रम सुरू होत असून या डॉक्टर्सची निवास व्यवस्थाही महानगरपालिकने केली असल्याची माहिती आयुक्तांनी दिली. जे काम करू ते दर्जेदार करू’ ही भूमिका ठेवून डॉक्टरांनी काम करावे अशी अपेक्षा व्यक्त करीत यातूनच आरोग्य सेवेचा नावलौकिक वाढेल असे मत मांडले. हा अभ्यासक्रम म्हणजे भविष्यातील वैद्यकीय महाविद्यालयाची पहिली पायरी असल्याचेही ते म्हणाले.

महानगरपालिकेच्या वाशी, नेरुळ, ऐरोली येथील सार्वजनिक रुग्णालय तसेच बेलापूर येथील माता बाल रुग्णालय या रूग्णालयांमध्ये कॉलेज ऑफ फिजीशियन अँड सर्जन ऑफ मुंबई यांचेकडे सीपीएस कोर्स सुरू करण्याकरिता नोंदणी प्राप्त झाली आहे. याद्वारे सार्वजनिक रुग्णालय, वाशी येथे बालरोग विभाग, स्त्रीरोग विभाग, शस्त्रक्रिया विभाग, अस्थीरोग विभाग, कान नाक घसा विभाग, वैद्यकशास्त्र विभाग, त्वचारोग विभाग, नेत्ररोग विभाग, बधिरीकरण विभाग, प्रयोगशाळा व रक्तपेढी विभाग अशा एकूण 11 विभागांकरीता एकूण 30 डॅाक्टर्स 24 तास उपलब्ध होणार आहेत. तसेच माँसाहेब मिनाताई ठाकरे सार्वजनिक रुग्णालय, नेरुळ व माता बाल रुग्णालय, बेलापूर येथे बालरोग व स्त्रीरोग ह्या 2 विभागांकरीता एकूण 8 डॅाक्टर्स आणि राजमाता जिजाऊ सार्वजनिक रुग्णालय, ऐरोली येथे 6 डॅाक्टर्स 24 तास उपलब्ध होणार आहेत. हा सदरचे डॉक्टर्स छएएढ परीक्षेद्वारे निवड झालेले असून कॉलेज ऑफ फिजीशियन ऑफ सर्जन ऑफ मुंबई यांचेमार्फत नियुक्त करण्यात आले आहेत. हे डॅाक्टर्स नमुंमपा रुग्णालयांत उपलब्ध झाल्यामुळे रुग्णांना दर्जात्मक आरोग्य सुविधा देणे शक्य होणार आहे तसेच याव्दारे डॅाक्टरांच्या कमतरतेमुळे रुग्णसेवा पुरविताना येणार्‍या अडचणींवर मात करण्यात येत आहे. या डॉक्टरांना अभ्यासासाठी अद्यावत माहिती/ तंत्रज्ञान उपलब्ध होण्यासाठी ‘ई-लायब्ररी’ सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सी.पी.एस. कोर्सचा अभ्यासक्रम पदविकांसाठी दोन वर्षाचा व पदवीसाठी तीन वर्षाचा कालावधी असल्याने नवी मुंबई महानगरपालिकेकडे पहिल्या वर्षी 46 डॉक्टर्स तर तीन वर्षानंतर प्रत्येक वर्षी 100 पेक्षा जास्त डॉक्टर्स उपलब्ध असणार आहेत. या डॉक्टर्सच्या नियुक्तीमुळे नवी मुंबई महानगरपालिकेची आरोग्य सेवा अधिक सक्षम होणार असून नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा उपलब्ध करून देता येणार आहेत.