गोवर रुबेला लसीकरणविषयी कार्यशाळा

नवी मुंबई ः गोवर आणि रूबेला हे संक्रामक आजार असून याचा संसर्ग कुणालाच होऊ नये याकरिता खबरदारी घेत भारत सरकारच्या आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येणारा गोवर रूबेला लसीकरण कार्यक्रम 2018 नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सर्वांच्या सहयोगातून 100 टक्के यशस्वीरित्या राबवू असा विश्वास महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी व्यक्त केला. गोवर रूबेला लसीकरण कार्यक्रम राबविणेविषयी नियोजनाबाबत आयोजित कार्यशाळेप्रसंगी आयुक्तांनी उपस्थितांशी संवाद साधला. 

गोवर रूबेला लसीकरण करण्यात यावे याबाबत नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने मागील 7 ते 8 वर्षापासून महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाकडे पाठपुरावा करण्यात येत होता. आता याविषयी सकारात्मक भूमिका घेत संपूर्ण देशभरातच ही मोहीम हाती घेण्यात आली आहे याबद्दल आयुक्तांनी समाधान व्यक्त केले. गोवर, रुबेला लसीकरण मोहिमही याच वयोगटातील 9 महिने ते 15 वर्षाआतील मुलांमध्ये यशस्वीरितीने पार पाडण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. याकरीता नागरिकांमध्ये लसीकरणाबाबत मोठ्या प्रमाणावर जनजागृतीचे नियोजन करावे असे सूचित केले. नोव्हेंबर महिन्यात संपूर्ण राज्यभरात गोवर रुबेला लसीकरण हाती घेण्यात येऊन विशेषत्वाने नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील खाजगी व महानगरपालिकेच्या सर्व शाळांमध्ये 10 वी पर्यंतच्या मुलांना हे लसीकरण करण्यात येणार आहे. याकरीता आरोग्य, शिक्षण व समाजविकास या महानगरपालिकेच्या विभागांसह विविध स्वयंसेवी संस्था, मंडळे यांच्या परस्पर सहयोगातून तसेच बालरोगतज्ज्ञ यांच्या सहकार्याने ही मोहिम प्रभावीरित्या राबविण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे. या मोहिमेविषयी माहिती व प्राथमिक स्वरुपाची चर्चा या कार्यशाळेत करण्यात आली. भारत सरकारने 2020 पर्यंत गोवर या आजाराचे निर्मुलन व रुबेला या आजाराचे नियंत्रण करण्याचे उद्दीष्ट नजरेसमोर ठेवले असून नोव्हेंबर 2018 मध्ये महाराष्ट्र राज्यात गोवर रुबेला लसीकरण मोहिम हाती घेण्याचे ठरविले आहे. हि मोहिम किमान पाच आठवड्यांच्या कालावधीसाठी राबविण्यात येत असून पहिल्या सत्रात सर्व शाळांमध्ये लसीकरण मोहिम राबविण्याचे नियोजन आहे. त्यानंतर शाळेत न जाणारी मुले तसेच 9 महिने ते 3 वर्षापर्यंतची बालके यांच्याकरीता ही मोहिम प्रभावीपणे राबविली जाईल. या मोहिमेच्या अनुषंगाने संबंधित अधिकारी व कर्मचारी तसेच सहयोगी संस्था व डॉक्टर्स यांना आपली भूमिका व जबाबदारी कळावी यादृष्टीने आयोजित माहितीप्रद कार्यशाळेस व प्रशिक्षणास डॉक्टर्स व स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.