तळोजातील प्रदुषणाबाबत नाराजी

सार्वजनिक उपक्रम समितीने घेतला प्रदूषणाचा आढावा         

तळोजा : महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक उपक्रमाच्या व्यवस्थापनावर नियंत्रण ठेवण्यासाठी नेमण्यात आलेल्या सार्वजनिक उपक्रम समितीने तळोजासह, ठाणे-बेलापूर औद्योगिक वसाहतीचा पाहणी दौरा केला. प्रदूषण वाहनतळासह औद्योगिक वसाहतीमधील सुविधांचीही पाहणी केली. यावेळी तळोजा सीईटीपीच्या कामकाजाविषयीही नाराजी व्यक्त करण्यात आली. दौर्‍यानंतर त्याचा अहवाल शासनदरबारी मांडण्यात येणार आहे. 

भाजपा आमदार अनिल बोंडे व राष्ट्रवादीचे रामराव वडकुते यांनी सोमवारी पाताळगंगा एमआयडीसीची पाहणी केल्यानंतर मंगळवारी ठाणे-बेलापूर व तळोजा औद्योगिक वसाहतींना भेट दिली. तळोजातील दीपक फर्टिलायझर या कारखान्याला भेट देत पाहणी केली. तळोजातील ट्रक टर्मिनललाही भेट दिली. वाहनतळाची झालेली दुरवस्था पाहून त्याची स्थिती सुधारण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. तळोजा औद्योगिक वसाहतीच्या सांडपाणी प्रक्रिया केंद्राची प्रामुख्याने भेट समितीने घेतली व येथील संचालक मंडळाचे म्हणणे ऐकून घेत या प्रकल्पाबाबत नाराजी व्यक्त केली. सांडपाणी प्रक्रिया केंद्रातील मरगळ दूर करण्यासाठी हा प्रकल्प एमआयडीसीने चालवणे गरजेचे असल्याचे मत यावेळी आमदारांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. सीईटीपीत कोणत्या पद्धतीत पाण्याचे शुद्धीकरण करण्यात येते, या बाबत संचालक सतीश शेट्टी यांनी माहिती दिली; पण हरित लवादाच्या कचाट्यात अडकलेल्या सीईटीपीला दहा कोटी दंड भरावा, असे आदेश देण्यात आल्याचे समितीच्या लक्षात आल्यानंतर या सर्व प्रकारची माहिती संचालकांकडून घेऊन वस्तुस्थिती समजून घेतली. 

तळोजा औद्योगिक परिसरात लहान-मोठे असे एकूण 974 कारखाने आहेत, या कारखान्यांतून निघणार्‍या घातक पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी सीईटीपी उभी झाली. मात्र, हरितलवादाच्या म्हणण्यानुसार 2013 पासून या सीईटीपीने नियम धाब्यावर बसवून जलशुद्धीकरणाच्या नावावर गांभीर्याने हा प्रकल्प चालवला नसल्याचे स्पष्ट केले आहे, त्यामुळे हा प्रकल्प एमआयडीसीकडे हस्तांतर करण्यासाठी ही कमिटी प्रस्ताव सादर करणार आहे. सीईटीपीच्या सध्याच्या कामकाजावर पाहणीदौर्‍यातील समितीने शंकाही उपस्थित केली.

प्रदूषणविरहित दिवस

तळोजा औद्योगिक वसाहतीमधील प्रदूषण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. कारखान्यांच्या चिमणींमधून दिवस-रात्र धुराचे लोट निघत असतात. रसायनमिश्रित पाणी कासाडी नदीमध्ये सोडण्यात येत असते; परंतु आमदारांची समिती येणार असल्यामुळे बहुतांश कारखान्यांमधून हवेत जाणारे धुराचे लोट व रसायनमिश्रित पाणी बाहेर येत नव्हते. एक दिवस प्रदूषणविरहित गेल्याची प्रतिक्रिया जाणकारांनी व्यक्त केली.