महिलांच्या सबलीकरणातूनच येईल आर्थिक समृद्धी - पंकजा मुंडे

मिलाप कार्यक्रमाचा शुभारंभ, 30 गाळ्यांचे लोकार्पण

नवी मुंबई ः ग्रामीण भागात महिलांच्या आर्थिक स्वावलंबनातून निर्माण होणार्‍या सबलीकरणातूनच आर्थिक समृद्धी येईल, त्यासाठी राज्य शासनाच्या महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान आणि मिलापच्या माध्यमातून महिला बचत गटांच्या चळवळीला पाठबळ देऊन येत्या दोन वर्षात पाच लाख महिला बचत गट स्थापन करण्यात येतील, असे प्रतिपादन राज्याच्या ग्रामविकास, महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी खारघर येथे केले.

खारघर नवी मुंबई येथील उमेद, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान व फिक्की यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मिलाप  या नाविण्यपूर्ण उपजिवीका गतिवर्धक कार्यक्रमाचे व ग्रामविकास विकास विभागाने बांधलेल्या 30 दुकान गाळ्यांच्या लोकार्पण  सोहळा आज राज्याच्या  ग्रामविकास, महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते सोमवारी पार पडला. या सोहळ्यास श्रीरंग बारणे, आ.निरंजन डावखरे, आ.प्रशांत ठाकूर, पनवेल महापालिकेच्या महापौर डॉ. कविता चौतमल, फिक्कीचे  चेअरम्न निखिल अग्रवाल, अति. संचालक रुबाब सूद, महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमला आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलतांना मुंडे म्हणाल्या की, महिला ही माता असते, त्यामुळे ती हिम्मत कधीच हरु देत नाही. या ग्रामीण भागातील महिलांमधील उद्यमशक्तीला चालना देण्यासाठी बचतगटांच्या माध्यमातून विविध व्यवसायात या महिला पुढे येत आहेत. आतापर्यंत या महिलांनी घेतलेल्या व्यवसाय कर्जापैकी 99 टक्के कर्जाचा परतावा केला आहे. त्यामुळे बँकांनी महिलांना अर्थसहाय्य देऊन पाठबळ द्यावे. या महिलांनी उत्पादित केलेल्या उत्पादनांना शहरी भागात बाजारपेठ मिळावी यासाठी येथील 30 गाळ्यांमध्ये त्यांना रोटेशन पद्धतीने जागा उपलब्ध करुन दिली जाईल. दर 15 दिवसांत या महिला येथे येऊन आपली उत्पादने विक्री करु शकतील. या शिवाय या महिलांच्या उत्पादनांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळावी यासाठी फिक्कीसारख्या संस्थेबरोबर सांमजस्य करार करण्यात आला असून त्यासाठी ऑनलाईन पोर्टल विकसित करुन त्यांना जगाची बाजारपेठ उपलब्ध करुन दिली जाईल, असेही त्या म्हणाल्या. ग्रामीण भागातील महिलांच्या आर्थिक सबलीकरणाच्या या चळवळीला बळकटी देऊन ग्रामीण भागात आर्थिक स्थैर्य निर्माण करण्याचे आमचे उद्दिष्ट्य आहे.  

यावेळी मिलाप या पुस्तिकेचे प्रकाशन ना. मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले तर त्यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान व फिक्की यांच्यात सांमजस्य करार करण्यात आला. तसेच उत्कृष्ट कार्य करणार्‍या महिला बचत गटांना सन्मानित करण्यात आले.