गणेश मंडळानी न्यायालयाच्या आदेशाचे पालन करावे

वरीष्ठ पोलिस निरीक्षक निवृत्ती कोल्हटकर

उरण  ः हिंदूचा प्रमुख सण म्हणून सार्वजनिक गणेशोत्सवाकडे पाहिले जाते. यंदा 13 सप्टेंबरला गणेश चतुर्थीच्या दिवशी सार्वजनिक गणपती विराजमान होणार असून 23 सप्टेंबरला अनंत चतुर्दशीच्या दिवशी 10 दिवसाच्या गणेश मुर्तीचे मोठ्या थाटामाटात ढोल ताशे वाजवत विसर्जन करण्यात येणार आहे त्या अनुषंगाने समाजात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, जातीय सलोखा टिकून रहावा, पोलिस प्रशासन व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांच्यात योग्य तो समन्वय राहावा या दृष्टीने पोलिस प्रशासन तर्फे एका सभेचे आयोजन करण्यात आले होते.

गणेशोत्सवाच्या काळात गणेशोत्सव मंडळ परिसरात तसेच गणपती आणताना,शेवटच्या दिवशी मिरवणूक काताना कोणतेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कोकण ज्ञानपीठ महाविद्यालय, उरण येथे एका सभेचे आयोजन करण्यात आले होते. या मीटिंगला वरिष्ट पोलिस निरीक्षक-निवृत्ती कोल्हटकर, पोलिस निरीक्षक गुन्हे विभाग-अतुल आहेर, सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश कराड, वीज महावितरण मंडळ उरण चे अधिकारी-श्री झगडे तसेच  उरण मधील अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते, मंडप डेकोरेटरचे काम करणारे राजकुमार मंडप डेकोरेटर्स-बोरी, संजय डेकोरेटर्स नागाव, वसंत डेकोरेटर्स बाझारपेठ उरण चे पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते. गणेशोत्सवाच्या अनुषंगाने पोलिस प्रशासन तर्फे वरिष्ट पोलिस निरीक्षक निवृत्ती कोल्हटकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. मार्गदर्शन करताना ते म्हणाले की गणेशोत्सवाच्या काळात समाजात शांतता नांदावी,कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी या दृष्टीने उरण मधील सर्व गणेशोत्सव मंडळानी पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे. सार्वजनिक गणपती स्थापनेकरिता नगरपालिकेने/ग्राम पंचायतने/खाजगी मालक यांनी नेमुन दिलेली जागा व नेमुन दिलेले क्षेत्र(लांबी व रुंदी) याचे उल्लंघन होणार नाही असा मंडप/ स्टेज बांधण्यात यावा. नगरपालिकेने/ग्रामपंचायतने/खाजगी मालक यांनी ठरवून दिलेल्या काल मर्यादेतच मंडप/ स्टेज अस्तित्वात राहिल. उत्सव प्रसंगी मंडप स्टेज उभारण्यासाठी,परवानगी देण्यासाठी उरण नगर पालिकेच्या वतीने तयार करण्यात आलेले मार्गदर्शक तत्वे यांचे काटेकोरपणे पालन करावे, गणेश मंडपात कोणत्याही जातीय/धार्मिक भावना भडकुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असे आक्षेपार्ह बैनर,देखावा, किंवा फलक नसावा. गणपती मुर्तीच्या संरक्षणाची सर्वस्वी जबाबदारी मंडळ व त्यांचे पदाधिकारी यांचे राहिल. श्री च्या सजावटीच्या बाजूस समई,निरंजन, अगरबत्ती ठेवताना सजावटीला काही धोका निर्माण होवून आग लागणार नाही याची दक्षता आयोजक घेतील.मोकाट जनावरे मंडपाच्या जवळपास फिरनार नाहीत याची मंडळाकडून नेमन्यात येणार्‍या स्वयंसेवकांनी काळजी घ्यावी. उच्च न्यायालय, मुंबई यांनी दिलेल्या निर्णयाच्या अधीन राहुन त्यांनी दिलेल्या अटी व शर्तीचे उल्लंघन होणार नाही याची अंमलबजावणी काटेकोरपणाने करावी, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल. पोलिस अधिकारी व अंमलदार यांनी दिलेले कायदेशीर आदेश बंधनकारक राहतील. सार्वजनिक गणपती विसर्जन मिरवणूक सुरळीत व शांततेत पार पाडन्याची सर्वस्वी जबाबदारी आयोजकांची असेल.सर्वोच्च न्यायालय यांचे 18 जुलै 2005  चे निकालात दिलेल्या निर्देशानुसार तसेच ध्वनी प्रदूषण नियमन व नियंत्रण नियमावली 2000 अन्वये ध्वनीक्षेपक वापराची वेळ सकाळी 7 ते रात्री 22 वाजेपर्यंत आहे. या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करुनच गणेशोत्सव शांततेत साजरा करावा असे आवाहन वरिष्ट पोलिस निरीक्षक निवृत्ती कोल्हटकर यांनी उरण मधील गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकार्‍यांना केला.