सहा महिन्यांत 32 बांगलादेशी अटकेत

नवी मुंबई : मुंबई, नवी मुंबईत बेकायदेशीररीत्या वास्तव्यास असलेल्या बांगलादेशी नागरिकांना अटक करण्याची मोहीम मुंबई पोलिसांसह नवी मुंबई पोलिसांनी सुरू केली आहे. या मोहिमेंतर्गत मुंबई पोलिसांच्या विशेष शाखेने नेरुळच्या करावे गावातून आणखी 10 बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे. सहा महिन्यांमध्ये पोलिसांनी नवी मुंबईच्या विविध भागातून 32 बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे. 

नेरुळ येथील करावे गावात काही बांगलादेशी नागरिक बेकायदेशीररीत्या राहत असल्याची माहिती मुंबई पोलिसांच्या विशेष शाखेला मिळाली होती. त्यानुसार विशेष शाखेच्या पथकाने एनआरआय पोलिसांच्या मदतीने मंगळवारी सकाळी करावे गावातील गजानन तांडेल हाऊसमध्ये छापा मारला असता, त्याठिकाणी रेणू अब्दुल रसीद काझी (55), सुफियान अब्दुल रशीद काझी (35), जॉन अब्दुल रशीद काझी (22), अब्दुल हालिम अब्दुल रशिद काझी (28), सपना अब्दुल अलीम काझी (26) हे आढळून आले. तसेच करावे गावातील विठ्ठल मंदिराजवळ बेगम शमतुला शेख (35), शमतुला ऐनुल शेख (37), रियाज शमतुल्ला शेख (19) आढळून आले. तर मुस्लीमा अफसरअली मुल्ला (28) आणि अफसरअली आकेरअल्ली मुल्ला (37) हे दोघे करावे गाव झोपडपट्टीत आपल्या तीन-चार मुलांसह राहत असल्याचे आढळून आले. विशेष म्हणजे या कारवाईत पकडण्यात आलेले सर्व बांगलादेशी नागरिक आजूबाजूच्या परिसरामध्ये घरकाम तसेच बिगारी काम करून राहत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे या सगळ्यांना पारपत्र कलमान्वये अटक करण्यात आली आहे.  

बॉक्स

नवी मुंबईच्या अ‍ॅन्टी टेररिझम स्कॉडने (एटीएस) 13 मार्च रोजी पनवेलच्या जुईगावात बेकायदेशीररीत्या वास्तव्यास असलेल्या पाच बांगलादेशी नागरिकांना अटक केली होती. विशेष म्हणजे यातील चौघांकडे भारताचे आधारकार्ड आढळून आले होते. 21 एप्रिल रोजी पहाटे कोपरखैरणे सेक्टर 19 भागात छापा मारून त्या भागात बेकायदेशीररीत्या वास्तव्यास असलेल्या 9 बांगलादेशी नागरिकांना अटक केली होती. मुंबई पोलिसांच्या विशेष शाखेने 12 जुलै रोजी एनआरआय पोलिसांच्या मदतीने नेरुळमधील करावे गावात बेकादेशीररीत्या राहणार्‍या 10 बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे. यात सहा महिला व चार पुरुषांचा समावेश आहे. त्यानंतर मुंबई पोलिसांच्या विशेष शाखेने 24 ऑगस्ट रोजी नेरुळच्या दारावे आणि सारसोळे भागात छापा मारून चार बांग्लादेशी नागरिकांना अटक केली आहे. त्याचप्रमाणे 25 ऑगस्ट रोजी कळंबोली सेक्टर 4 ईमधून चार बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे.