पालिका बदलणार 798 नवे विद्युत खांब

1 कोटी 75 लाख 33 हजार 362 कोटींचा प्रस्ताव मंजूर 

नवी मुंबई : नवी मुंबई पालिकेच्या वतीने बेलापूर ते वाशी (परिमंडळ 1) मधील गंजलेले, तुटलेले, नादुरुस्त असलेले 798 विद्युत खांब बदलण्यात येणार आहेत. हे खांब 25 वर्षांपूर्वीचे असल्याने बदलण्यात येणार आहेत. याबाबत अंदाजित 1 कोटी 75 लाख 33 हजार 362 रुपयांच्या प्रस्तावाला गुरुवारी झालेल्या स्थायी समितीत मंजुरी देण्यात आली.

25 वर्षांपूर्वी सिडकोने लावलेल्या विद्युत खांबांची दुरवस्था झाली आहे. नवी मुंबई महापालिका शहरात नवनवीन प्रकल्प राबवते. मात्र विद्युत खांबांबाबत पालिका उदासीन असल्याची टीका सर्वत्र होते. कित्येक ठिकाणी अद्याप विद्युत खांब गांजलेले असून ते धोकादायक अवस्थेत आहेत. टप्प्याटप्प्याने हे खांब बदलण्यात येणार असल्याचे प्रशासनाने सांगितले. पालिकेने काही भागांची नावे व विद्युत खांबांची संख्या सांगितलेली असली तरी प्रत्यक्षात नादुरुस्त विद्युत खांब अनेक आहेत असे सदस्यांनी सांगितले. तसेच फक्त शहरांमध्ये लक्ष न देता गावांमध्ये लक्ष देण्यात यावे, अशी मागणी सदस्यांनी केली. तसेच पालिकेने अनेक ठिकाणे दाखवलेली असली तरी अद्याप अनेक ठिकाणे घेतली नसल्याचे सदस्यांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले. यावर प्रभागातील इतरही नादुरुस्त खांब बदलण्यात येतील, असे आयुक्तांनी सांगितल्यावर या प्रस्तावाला स्थायी समितीत मान्यता देण्यात आली.