Breaking News
मुंबई : शिवसेना आणि धनुष्यबाण कुणाकडे जाणार यावर आज केंद्रिय निवडणुक आयोगामध्ये महत्त्वपूर्ण सुनावणी पार पडली. मात्र याचा निकाल आज लागला नाही. ही सुनावणी आता शुक्रवारी, 20 जानेवारीला होणार आहे.
शिवसेनेच्या फुटीनंतर धनुष्यबाण या पक्षचिन्हासाठी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन गटांमध्ये संघर्ष निर्माण झाला होता. यावर आज केंद्रिय निवडणुक आयोगामध्ये सुनावणी झाली. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षप्रमुख पदाचा पाच वर्षांचा कार्यकाळ 23 जानेवारी 2023 रोजी संपत आहे. हा कायदेशीर पेच संपेपर्यंत त्यांना मुदतवाढ द्या अशी मागणी ठाकरे गटाने निवडणूक आयोगाकडे केली होती. शिवसेनेतील फूट म्हणजे निव्वळ कल्पना असल्याचा युक्तीवाद ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी केला. त्यामुळे शिवसेनेतील फूट ग्राह्य धरू नये असं सांगत ठाकरेंच्या नेतृत्वाखाली असलेली शिवसेना हीच खरी शिवसेना असल्याचा दावा कपिल सिब्बल यांनी केला. शिंदे गटाच्या याचिकेत अनेक त्रुटी असून शिंदे गटाच्या बाहेर जाण्यामुळे पक्षाच्या स्थितीवर कोणताही परिणाम झाला नसल्याचा दावा कपिल सिब्बल यांनी केला. तसेच शिंदे गटाचे आमदार आणि खासदार, ज्यांची संख्या त्या गटाकडून सांगितली जाते, ते सर्वजण उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली निवडून आले आहेत, लोकांनी पक्षाच्या धोरणांना समोर ठेऊन मतदान केलं. त्यामुळे आमदार आणि खासदाराची संख्या ध्यानात घेऊ नये अशी विनंती कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाकडे केली. महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने पक्ष आणि पक्षचिन्हासंबंधी निर्णय देण्यासाठी घाई करू नये, सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीपर्यंत थांबावं अशी मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली. शिंदे गटाचे वकील जेठमलानी यांनी त्यामध्ये कोणत्याही त्रुटी नसल्याचा दावा केला. तसेच या आधीच्या काही सुनावणींचा दाखला शिंदे गटाच्या वतीने देण्यात आला.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aaple Rajya News
Aajchi Navi Mumbai