पोलीस-नागरिक संवादासाठी समन्वय बैठक

नवी मुंबई ः सर्वसामान्यांना त्यांच्या समस्या आणि तक्रारी थेट पोलीस अधिकार्‍यांसमोर मांडता याव्यात यासाठी विष्णुदासभावे नाट्यगृहात पोलिसांनी समन्वय बैठकीचे आयोजन केले होते. पोलीस आणि नागरिकांमध्ये संवाद घडवून आणण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाविद्यालयीन तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गेल्या काही दिवसांपासून विविध कारणांमुळे नवी मुंबईतील वातावरण संवेदनशील झाले आहे. त्या पाश्वभूमीवर शहरातील शांतता अबाधित ठेवण्यासाठी तसेच पोलीस आणि नागरिकांमध्ये संवाद घडवून आणण्यासाठी समन्वय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. नवी मुंबई परिमंडळ एकसह शहरात मराठा क्रांती आंदोलनादरम्यान दंगली घडल्या. दोन गटांत तेढ निर्माण झाली. यामुळे शहारत अतिशय संवेदनशील वातावरण निर्माण झाले होते. मालमत्तांचे नुकसान झाले होते. अंतर्गत वाद निर्माण होऊन एकाचा बळी गेला. आजही शहरीत ठिकठिकाणी बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या पाश्वभूमीवर शहरात शांतता कायम ठेवण्यासाठी नागरिक आणि पोलिसांमध्ये संवाद निर्माण करून कायदा आणि सुव्यवस्था जपणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याची जणीव करून देण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या दंगली दरम्यान शहराचे मोठे नुकसान झाले. केवळ सुसंवादाअभावी संवेदनशील वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यापुढेही असे कार्यक्रम आयोजित केले जाती असे  डॉ. सुधाकर पठारे, पोलीस उपायुक्त, परिमंडळ 1 यांनी सांगितले.