Breaking News
नवी मुंबई ः श्री गोवर्धनी सार्वजनिक सेवा संस्था व सिडको यांच्या संयुक्त विद्यमाने सीबीडी येथील सुनील गावस्कर मैदान येथे आयोजित करण्यात आलेल्या नवी मुंबई सांस्कृतिक कला क्रीडा महोत्सवाचा शनिवारी उत्साहात प्रारंभ झाला. पुढील 10 दिवस नवी मुंबईकरांना विविध कार्यक्रमाची ही मेजवानी येथे मिळणार आहे.
नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त राजेश नार्वेकर व माजी महापौर जयवंत सुतार यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करून सदर महोत्सवाचे उद्धाटन करण्यात आले. यावेळी अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले, उपायुक्त दादासाहेब चाबुकस्वार, माजी सभागृह नेते रविंद्र इथापे, माजी नगरसेवक सुनील पाटील, दीपक पवार, निलेश म्हात्रे तसेच असंख्य ज्येष्ठ नागरिक, महिला व नागरिक उपस्थित होते. यावेळी बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळा, महिलांसाठी हळदी-कुंकू समारंभ व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले होते. कोव्हीड काळात उत्कृष्ट आरोग्य सेवा बजावल्याबद्दल पालिका अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले यांचा सत्कार यावेळी करण्यात आला.
आमदार मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले कि, सालाबादप्रमाणे यावर्षीही श्री गोवर्धनी सार्वजनिक सेवा संस्था व सिडको यांच्या संयुक्त विद्यमाने नवी मुंबई सांस्कृतिक कला क्रीडा महोत्सव-2023 चे आयोजन करण्यात आलेले आहे. या संस्थेच्या वतीने गेली 27 वर्षे समाजपयोगी, शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रम, नाटय, संगीत व विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. कोव्हीड काळानंतर या कार्यक्रमाचे आयोजन होत असून कार्यक्रमाच्या पहिल्याच दिवशी नागरिकांचा उत्साह पाहून आनंद वाटत आहे. महिला व विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा तसेच त्यांना एक व्यासपीठ तयार व्हावे या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन दरवर्षी करण्यात येते. नवी मुंबईतील हजारो महिला या निमित्ताने एकत्र येऊन आपली कला सादर करतात. विद्यार्थ्यांसाठी व महिलांसाठी विविध मनोरंजक स्पर्धा आयोजित करून त्यांचे मनोबल वाढवले जाते. आजपासून या महोत्सवाला सुरुवात होत असून पुढे अजून 10 दिवस नवी मुंबईकरांसाठी ही मेजवानी असणार आहे असे आ. मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aaple Rajya News
Aajchi Navi Mumbai