प्रदर्शनाला उत्स्फुर्त प्रतिसाद

नवी मंबई ः सिडको तारा योजनेअंतर्गत सिडको तार कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्राद्वारे उद्योजकता विकास प्रशिक्षण दिलेल्या प्रकल्पग्रस्त महिलांनी निर्मिलेल्या वस्तू व उत्पादनांच्या विक्रीसाठी 21 ऑगस्ट 2018 रोजी बेलापूर रेल्वे स्थानक येथील टॉवर क्र. 2 च्या खालील जागेत सकाळी 10.00 ते सायं. 06.00 या वेळेत प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनामध्ये इमिटेशन ज्वेलरी, फॅन्सी कापडी बॅग, पेपर बॅग, विविध प्रकारचे मसाले इ. उत्पादने विक्रीकरिता उपलब्ध होती. 

सिडको तारा योजने अंतर्गत नवी मुंबई प्रकल्पाकरिता संपादित केलेल्या गावांतील प्रकल्पग्रस्त महिलांना विविध प्रकारच्या ग्राहकोपयोगी वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात येते. या महिलांना नोकरी व उद्योगाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात तसेच त्यांच्यातील व्यवस्थापन कौशल्य विकसित व्हावे हा या प्रशिक्षणामागील उद्देश आहे. नुकतेच विमानतळ गाभा क्षेत्रातील उलवे व उरण तालुक्यातील धुतूम येथे लेबलिंग व पॅकेजिंगसह 20 प्रकारचे मसाले बनवण्याच्या प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. तर विमानतळ क्षेत्रातील वरचे ओवळे येथे फॅन्सी कापडी बॅगा तयार करण्याच्या प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षण वर्गांत सदर गावांतील महिलांनी उत्स्फुर्तपणे आपला सहभाग नोंदवला.

या प्रदर्शनातील विविध उत्पादनांना ग्राहकांचा भरघोस प्रतिसाद लाभला. सुमारे 450 लोकांनी या प्रदर्शनास भेट दिली. निव्वळ मसाल्यांच्या विक्रीपोटी रु. 15,000 तर पर्यावरणपूरक कापडी पिशव्यांच्या विक्रीतून रु. 2000 अशी एकूण 21,700 रुपयांची उच्चांकी विक्री या प्रदर्शनाद्वारे केवळ काही तासांत झाली. या प्रदर्शनात वळवली, नेरूळ, धुतूम, वरचे ओवळे, उलवे या प्रकल्पबाधित गावांतील 23 महिला सहभागी झाल्या होत्या. सिडको तारातर्फे देण्यात येणारे उद्योग प्रशिक्षण व आपण निर्मिलेल्या उत्पादनांना मिळालेला उदंड प्रतिसाद यांमुळे प्रकल्पग्रस्त महिलांचा आत्मविश्वास वाढीस लागला. याबद्दल या महिलांनी सिडको तारा केंद्राचे आभार मानत समाधान व्यक्त केले. अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे महिलांमधील उद्यमशीलता व कौशल्ये वाढीस लागून त्या आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनतील असा विश्वास या प्रसंगी व्यक्त करण्यात आला.