‘सुवर्णकन्या’ इंग्लंडला रवाना

      नवी मुंबई ः रा. फ. नाईक विद्यालयाच्या सुवर्णकन्या शीतल भोर आणि पौर्णिमा सकपाळ यांची भारतीय खो-खो संघात निवड झाली आहे. त्यासाठी त्या लंडनला 30 ऑगस्टला रवाना झाल्या. संपूर्ण नवी मुंबईतून या दोन्ही खेळाडूंना भारताच्या संघातून इंग्लंडला आंतरराष्ट्रीय खो-खो स्पर्धेत सहभाग घेण्याचा मान प्राप्त झाला आहे. सदर स्पर्धेचे सामने हे 1 ते 4 सप्टेंबर रोजी लंडन येथे होणार आहेत. दोघींच्या भारतीय खो-खो संघातील निवडीमुळे संपूर्ण नवी मुंबईमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. 

विविध माध्यमांतून पौर्णिमा सकपाळ आणि शीतल भोर यांचे मनोधैर्य वाढविले जात असून, नवी मुंबईच्या आणि रा. फ. नाईक विद्यालयाच्या वैभवशाली कामगिरीत मानाचा तुरा लावल्यामुळे श्रमिक शिक्षण मंडळाचे संस्थापक गणेश नाईक, संस्थेचे अध्यक्ष आ.संदीप नाईक, संस्थेचे प्रमुख विश्‍वस्त डॉ. संजीव गणेश  नाईक, माजी महापौर  सागर नाईक व संस्थेचे सचिव  सुरेश नाईक यांनी दोघींना शुभेच्छा देऊन पुढील वाटचालीसाठी सदिच्छा दिल्या.