ओबीसींच्या नोकर भरतीसाठी कोकण रेल्वे सकारात्मक

नवी मुंबई ः कोकण रेल्वेमधील इतर मागासवर्गीय(ओबीसी) समाजाचा नोकरीचा अनुशेष भरण्यास कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय-संचालक संजय गुप्ता यांनी सकारात्मकता दर्शविली आहे.

व्यवस्थापकीय-संचालक गुप्ता यांच्याबरोबर मंगळवारी ऑल इंडिया ओबीसी रेल्वे एम्प्लॉईज असोसिएशनची वार्षिक बैठक असोसिएशनचे मुख्य संरक्षक डॉ. संजीव गणेश नाईक यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी असोसिएशनच्या विविध प्रलंबित मागण्या मांडण्यात आल्या. त्यापैकी बहुतांश मागण्या श्री. गुप्ता यांच्याकडून मान्य करण्यात आल्या. असोसिएशनचे झोनल अध्यक्ष रामनाथ पाटील, कार्यकारी-अध्यक्ष जी. के. लोखंडे, झोनल महासचिव पी. एम. महाजन आदी उपस्थित होते.कोकण रेल्वेमध्ये ओबीसींच्या नोकरीचा अनुशेष भरण्यात यावा, कोकण रेल्वेच्या ज्या विभागांमध्ये हा अनुशेष भरला आहे, त्याची माहिती देण्यात यावी, अशी  प्रमुख मागणी असोसिएशनने बैठकीत केली. त्यावर हा अनुशेष भरु तसेच अनुशेषअंतर्गत जेथे नोकर भरती केली आहे त्याची माहिती देवू, अशी ग्वाही व्यवस्थापकीय-संचालक गुप्ता यांनी दिली. नोकर भरतीमध्ये प्रकल्पग्रस्तांना देखील प्राधान्य देण्याची मागणी असोसिएशनने केली असता ती मान्य करण्यात आली. भविष्यातील नोकर भरतीत या आश्‍वासनाची अंमलबजावणी करण्याचे संकेत त्यांनी दिले. असोसिएशनचे कामकाज करण्यासाठी कार्यालय उपलब्ध करुन देण्याची मागणी बैठकीत करण्यात आली. ती देखील मंजूर करण्यात आली.