Breaking News
उरण कोळीवाडा ग्रामस्थ झाले आक्रमक ; उरण बायपास रस्त्याचे काम थांबविले
उरण ः उरण बायपास रस्त्याचे काम सिडकोमार्फत सुरु आहे. या प्रकल्पात 134 हुन अधिक व्यक्ती बाधित असून त्यांना अजूनही न्याय मिळालेला नाही. सिडकोने त्यांचे पुनर्वसन केले नाही. अनेक मागण्या अजून प्रलंबित असून विश्वासात न घेता या से काम सुरु असल्याने उरण कोळीवाडा ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. मागण्यांच्या पुर्ततेसाठी मंगळवारी सकाळी 11.00 वाजता कोटनाका काळाधोंडा येथे सिडकोने सुरु केलेले भरावाचे काम ग्रामस्थांनी थांबविले व सिडकोने सुरु केलेल्या कामाचा निषेध केला. आधी पुनर्वसन मगच प्रकल्प अशी भुमिका यावेळी ग्रामस्थांनी घेतली. मोठ्या संख्येने जमाव रस्त्यावर उतरल्याने कोणताही अनुचित प्रकार घडू नये व कामात अडथळा आणला म्हणून पोलीसांनी उपस्थित ग्रामस्थांना ताब्यात घेतले.
सिडकोच्या प्रकल्पापासून पारंपारिक मच्छीमारांची रोजी रोटीची मासेमारी जमीन वाचावी तसेच गुरुचरणाची संपूर्ण जागा सेझ मधून वगळण्यात यावी, मच्छीमारांना घरटी नुकसान भरपाई मिळावी व पारंपारिक मच्छीमारीचा रस्ता मोकळा ठेवावा, गावाला कायमस्वरूपी खेळाचे मैदान मिळावे, गावाची मेन उघडी (कळवड) चे काम करून सर्व परिसर स्वच्छ करून मिळावा, आधी पुनर्वसन मगच प्रकल्प करावे या विविध मागण्यांसाठी उरण तालुक्यातील उरण कोळीवाडा ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. या निषेध म्हणून त्यांनी सिडकोने सुरु केलेले भरावाचे काम ग्रामस्थांनी थांबविले. उरण कोटनाका-काळाधोंडा येथे मोठ्या प्रमाणात मॅग्रोज आहेत, समुद्राची खाडी सुद्धा आहे. या मॅग्रोज तोडून, खाडीवर मातीचा भराव करून हा बाह्य रस्ता (उरण बायपास रस्ता) बनविला जाणार आहे. हा रस्ता झाल्यास मोरा व आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना उरण बायपासमार्गाने सरळ शहराच्या बाहेरून निघता येईल व प्रवास सुखाचा होईल. मात्र ही जमीन उरण कोळीवाडा ग्रामस्थांची असून कोळीवाडा ग्रामस्थांना विचारात न घेता, विश्वासात न घेता या उरण बाय पास रस्ता (बाह्य रस्ता) चे काम सुरू करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. उरण बायपास रस्ता प्रकल्प मध्ये 134 हुन अधिक व्यक्ती बाधित असून त्यांना अजूनही न्याय मिळालेला नाही. याबाबत उरण बायपास रस्त्याचे काम थांबविण्यात यावे,आधी पुनवर्सन मगच प्रकल्प या मागणीसाठी उरण कोळीवाडा ग्रामस्थांनी मुंबई हायकोर्टात सुद्धा केस दाखल केली आहे. कोर्टाने महाराष्ट्र शासन,सिडको प्रशासनाला नुकसान ग्रस्त बाधितांचे, जमीनीचे सर्वेक्षण करा, समिती गठीत करा त्याचे अहवाल सादर करा असा आदेश महाराष्ट्र शासनाला दिलेले आहेत. तरी सुद्धा सिडको प्रशासनाने कोणतेही सर्वेक्षण न करता, समिती गठित न करता, अहवाल सादर न करता बायपास रस्त्याचे काम सुरू केले आहे. वास्तविक पाहता हे हायकोर्टाच्या आदेशाचे उल्लंघन आहे. मागण्या पूर्ण न झाल्याने व सदर रस्त्याच्या कामाचा विषय हायकोर्टात प्रलंबित असल्याने सिडकोने सुरु केलेल्या रस्त्याच्या भरावाच्या कामाला ग्रामस्थांनी विरोध केला. काम बंद करावे अशी मागणी ग्रामस्थांनी उरणचे नायब तहसीलदार नरेश पेढवी, न्हावा शेवा बंदराचे सहाय्यक पोलीस आयुक्त धनाजी क्षीरसागर, उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पाटील, गुन्हे विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण,सिडकोचे कार्यकारी अभियंता हणमंत न्हाणे यांच्याकडे केली होती. मात्र ग्रामस्थांच्या मागणीकडे शासकीय अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने, काम सुरु ठेवल्याने ग्रामस्थांनी सुरु असलेले काम बंद करण्याचा निर्णय घेतला. काम बंद करण्यासाठी आलेल्या ग्रामस्थांना पोलीसांनी ताब्यात घेतले. अंदाजे 110 हुन अधिक ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.
ग्रामस्थांच्या विविध मागण्या प्रलंबित आहेत.जोपर्यंत ग्रामस्थांच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत उरण बाय-पासचे काम बंद ठेवण्यात यावे अशी आम्हा सर्व ग्रामस्थांची मागणी आहे. तसेच अनेक विविध मागण्या आहेत यासाठी मी मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री, तहसिलदार आदि ठिकाणी पत्रव्यवहार सुद्धा केला आहे. शासनाने आमच्या मागण्या मान्य कराव्यात ही शासनाला नम्र विनंती आहे. - सूनिल भोईर,माजी सदस्य ग्रुप ग्रामपंचायत चाणजे.
उरण बायपास रस्त्याचे काम सुरू असताना कोणतेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला आहे.ग्रामस्थांनी शासकीय कामात अडथळा आणल्याने, ग्रामस्थांनी काम थांबविल्याने उपस्थित ग्रामस्थांना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी ग्रामस्थांना ताब्यात घेतले असून पुढील कार्यवाही सुरु आहे.- धनाजी क्षीरसागर, सहाय्यक पोलिस आयुक्त न्हावा शेवा बंदर.
महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसारच उरण बायपास रस्त्याचे काम सुरु असून या रस्त्यासाठी लागणारे सर्व आवश्यक ते परवानग्या घेतले आहेत. नागरिकांनी, ग्रामस्थांनी उरण बायपास रस्त्यासाठी प्रशासनाला आवश्यक ते सहकार्य करावे अशी मी विनंती करतो. -हनुमंत न्हाणे, कार्यकारी अभियंता, सिडको, द्रोणागिरी नोड.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai