एपीएमसीतील फळांची आवक निम्म्यावर

नवी मुंबई ः थेट पणन अंतर्गत कृषी मालावरील नियमन हटविल्याने आता मुंबईत येणार्‍या मालाच्या गाड्यांना बाजार समितीमध्ये येऊन नोंद करण्याची गरज राहिलेली नाही. त्यामुळे आता फळांच्या 50 टक्के गाड्या थेट मुंबईत जाऊ लागल्या आहेत. बाजार समितीमध्ये येऊन बाजार फी, सेस भरून देण्यापेक्षा थेट मुंबईत माल घेऊन जाणे सर्वांना सोयीस्कर वाटत आहे. त्यामुळे मुंबईतील व्यापारीही थेट मालाच्या गाड्या मुंबईत मागवून घेत आहेत. परिणामी, फळ बाजारावर मंदीचे वातावरण पाहायला मिळत आहे.

पूर्वी फळ बाजारात नियमितपणे चारशे ते साडेचारशे फळांच्या गाड्या येत होत्या. मात्र आता ही आवक दोनशे ते अडीचशे गाड्यांवर येत आहे. मुंबईची फळांची मागणी पूर्ण करण्यासाठी लागणारी आवक थेट मुंबईतील किरकोळ व्यापार्‍यांकडे जात आहे. त्यातच फेरीवाल्यांवर होणारी कारवाई, यामुळे रस्त्यावर, हातगाडीवर फळे विकणार्‍यांचे प्रमाणही कमी झाले आहे. मुंबईत थेट गाड्या जात असल्याने बाजार समितीचा सेस, फी कोणत्याही प्रकारचा कर व्यापार्‍यांना भरावा लागत नाही. त्यामुळे मालाच्या किमतीमध्ये घट होते. परिणामी, घाऊक बाजारपेठेपेक्षाही काही प्रमाणात माल कमी दरात आता मुंबईमध्ये उपलब्ध होत असल्याचे व्यापार्‍यांचे म्हणणे आहे. त्यामुळे अधिक पैसे मोजून वाशीतून माल का खरेदी करावा, असा प्रश्न मुंबईतील किरकोळ व्यापारी विचारत आहेत. त्यामुळे वाशीतील घाऊक बाजारात आता मुंबईतून खरेदीसाठी येणार्‍या ग्राहकांची संख्याही कमी होऊ लागली आहे. मात्र यामुळे शेतकर्‍यांच्या मालाला योग्य भावही मिळत नाही आणि ग्राहकांना कमी दरात काहीच मिळत नाही. त्यामुळे नियमन हटविल्याचा फायदा कुणाला झाला आहे, असा प्रश्न घाऊक व्यापारी विचारत आहेत.