स्वस्त घराच्या आमिषाने एक कोटीची फसवणूक

नवी मुंबई ः स्वस्त घरांचे आमिष दाखवून सामान्यांची फसवणुक करण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. उलवे परिसरात ‘एक्सलेंट प्रॉप्रर्टी’ कडून स्वस्तात घरे देत असल्याचे सांगून 32 जणांची सुमारे 1 कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. एनआरआय पोलिस ठाण्यात या विरोधात तक्रारी दाखल झाल्या असून एक्सलेंट प्रॉपर्टीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी अजीव मिश्रा उर्फ सूरज चौबे, गौरव कुलकर्णी, सौरब मंडल यांना अटक केली असून अन्य चार आरोपी फरार आहेत. 

नव्याने विकसीत होत असलेल्या उलवे नोडमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिक घरे विकत घेण्यासाठी येत आहेत. उलवे सेक्टर 19मधील राज हेरिटेज या इमारतीमध्ये एक्सलेंट प्रॉप्रर्टीच्या नावाने अजीव मिश्रा व त्याच्या सहकार्‍याने गाळा भाड्याने घेऊन त्या ठिकाणी बोगस व्यवसाय सुरू केला होता. एक्सलेंट प्रॉप्रर्टीमध्ये नागरिक घर विकत घेण्यासंदर्भात विचारणा करण्यासाठी गेल्यानंतर आजूबाजूच्या परिसरातील बांधकाम पूर्ण झालेले, तसेच बांधकाम सुरू असलेल्या इमारतीमधील घरे दाखविली जात होती. ही घरे एक्सलेंट ग्रुपच्या नावाने असून बिल्डरकडून एनओसी घेऊन खरेदीखताच्या माध्यमातून ट्रान्सफर केली जाईल, असे सांगण्यात येत होते. बाजारभावापेक्षा स्वस्तात ही घरे विकत असल्याचे सांगून नागरिकांना भुरळ घातली जात होती. ग्राहकांकडून घराच्या 20 ते 30 टक्के रक्कम बुकिंग रक्कम म्हणून घेण्यात येत होती. मात्र घर बुक केल्यानंतर कर्जाची प्रक्रिया करण्यास टाळाटाळ केली जात होती. अखेर काहींनी पोलिसांकडे धाव घेतली. एनआरआय पोलिस ठाण्यात एक्सलेंट प्रॉपर्टीविरोधात 10 तक्रारी दाखल आहेत. 

एक्सलेंट प्रापर्टीचे अजीव मिश्रा उर्फ सूरज चौबे, गौरव कुलकर्णी, सौरब मंडल यांना पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेले आरोपी मुंबईतील असून या आरोपींच्या विरोधात मुंबईतील विविध पोलिस ठाण्यांत फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. गुन्हे शाखा युनिट 1चे सहाय्यक पोलिस निरीक्षक अनंत सहाणे या प्रकरणाचा तपास करत आहेत.