पेट्रोल कंपन्यांना बसणार कोट्यावधींचा फटका

नवी मुंबई ः देशात दररोज पेट्रोल आणि डिझेलचे भाव कणाकणाने वाढत आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या भावाने शंभरी गाठू नये म्हणून देशातील सर्व ऑईल कंपन्या देव पाण्यात ठेवून आहेत. जर या किंमतींनी शंभरी गाठली तर संपुर्ण देशातील पेट्रोल/ डिझेल भरणारे पंप बदलून देण्याची जबाबदारी या कंपन्यांवर येणार असल्याने कोट्यावधी रुपयांचा फटका बसण्याच्या शक्यतेने मोठी अस्वस्थता ऑईल कंपन्यात पसरली आहे.

देशात इंडियन ऑईल, हिंदूस्तान पेट्रोलियम, भारत पेट्रोलियम तसेच रिलायन्स, ईस्सार या कंपन्यांचे हजारो पेट्रोलपंपाचे जाळे पसरले आहे. पेट्रोलपंप उभारताना सर्व यंत्रसामुग्री  संबंधित कंपन्यांकडून पेट्रोलपंप- धारकांना दिली जाते. पेट्रोलपंप चालकांनी त्यात हेराफेरी करु नये हा उद्देश कंपन्यांचा आहे. परंतु या कंपन्यांना कधी स्वप्नातही वाटले नव्हते की देशात एकवेळ पेट्रोल-डिझेलचा दर शंभरी गाठेल. त्यामुळे या कंपन्यांनी पेट्रोल-डिझेल 

डिस्पेन्सर युनीट बनवताना त्यात दोन अंकीच दर  अंतर्भुत केला आहे. त्यामुळे पेट्रोल किंवा डिझेलच्या दराने शंभरी गाठली तर या डिस्पेन्सर युनीट्सची शंभरी भरणार असल्याने सर्व ऑईल कंपन्या भांबावून गेल्या आहेत. त्यांना एकत्रितपणे एकाचवेळी देशातील लाखो पेट्रोलपंपांचे डिस्पेन्सर युनीट्स बदलून द्यावे लागणार आहेत. त्यासाठी त्यांना शेकडो कोंटीची तरतूद तर करावी लागेल शिवाय हे युनीट्स बदलताना अनेक तासांचे मनुष्यबळ वाया जाणार आहे. त्यामुळे ग्राहकांनाही मोठा मनस्ताप सहन करावा लागणार आहे. या सर्व धास्तीमुळे पेट्रोल कंपन्यांनी देशातील पेट्रोल-डिझेलचा भाव शंभरी गाठू नये म्हणून देव पाण्यात बुडवून ठेवले आहेत.