पावसाळापूर्व गटार सफाईचे 65 टक्के काम पूर्ण
- by Aajchi Navi Mumbai
- Apr 19, 2023
- 293
नवी मुंबई ः यंदा पावसाळा नेहमीपेक्षा उशीरा सुरु होणार असल्याचे अंदाज वर्तविण्यात आले असले तरी हवामान बदलांमुळे ठिकठिकाणी व नवी मुंबईतही अवकाळी पाऊस पडत असल्याचे लक्षात घेऊन पालिका आयुक्तांच्या मार्गदर्शनानुसार पावसाळापूर्व गटार सफाई कामे लवकरच एप्रिल महिन्याच्या आरंभापासून सुरु करण्यात आलेली आहेत. पावसाळापूर्व गटार सफाईचे काम 65 टक्के पूर्ण झाले असून कामाला वेग देण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत.
पावसाळापूर्व गटार सफाईमध्ये गटारांमधील गाळ साफ करणे व पाण्याच्या प्रवाहाला कोणत्याही प्रकारचा अडथळा होणार नाही याची दक्षता घेण्याच्या कामाचा समावेश असून हे काम दैनंदिन सफाई कामात समाविष्ट आहे. दैनंदिन साफसफाई करणाऱ्या 96 गटांतील ठेकेदारांमार्फत हे काम सुरु करण्यात आले असून 65 टक्के काम पूर्ण झाले आहे. पावसाळापूर्व गटार सफाईमध्ये गटारांमधील सुकी माती अथवा ओली माती अर्थात गाळ काढून गटारांच्या कडेला ठेवला जात असून सुकी माती 24 तासात व ओली माती अर्थात गाळ सुकल्यानंतर लगेचच उचलून घेऊन जाण्याचे निर्देश ठेकेदारांना देण्यात आलेले आहेत. यामध्ये कोणत्याही प्रकारची हलगर्जी खपवून घेतली जाणार नाही असे निर्देशित करण्यात आले असून त्यावर दंडात्मक कार्यवाही करण्याचेही सूचित करण्यात आले आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या 8 विभागांमध्ये एकूण 5,94,583 रनींग मीटर गटारांची सफाई केली जात असून या कामावर संबंधित विभागाचे स्वच्छता अधिकारी व स्वच्छता निरीक्षक बारकाईने लक्ष ठेऊन आहेत. गटारे सफाई झाल्यानंतर 31 ऑक्टोबरपर्यंत गटारातील पावसाचे पाणी वाहून जाण्यास प्रतिबंध होईल अशाप्रकारे पाण्याच्या प्रवाहातील अडथळे असल्यास ते दूर करण्याची जबाबदारीही संबंधित ठेकेदाराची आहे. सफाई काम करणाऱ्या कामगारांना हातमोजे, गमबूट असे सुरक्षा साहित्य पुरविण्याची जबाबदारीही ठेकेदाराची आहे. काही ठिकाणी सुरक्षा साहित्य दिले असूनही कामगार ते न वापरता काम करीत असल्याचे निदर्शनास येत आहे. या अनुषंगाने कामगारांना देण्यात आलेले साहित्य हे त्यांच्या सुरक्षेसाठी व आरोग्यासाठी हितावह असल्याचे कामगारांच्या लक्षात आणून देऊन त्याचा वापर त्यांच्याकडून केला जावा याकडे लक्ष देण्याच्या सूचना ठेकेदार व महानगरपालिकेचे स्वच्छता अधिकारी आणि स्वच्छता निरीक्षक यांना देण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे कामगारांनी जेवणापूर्वी साबणाने हात स्वच्छ धुणे आरोग्याच्या दृष्टीने गरजेचे असून त्याकरिता आवश्यक साहित्यही त्यांस पुरविण्याचे निर्देश ठेकेदारांस देण्यात आले आहेत.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai