महापौर, आयुक्त निवासासाठी भूखंड

नवी मुंबई : दोन वर्षापूर्वी स्थापन झालेल्या पनवेल महापालिकेला मुख्यालयासाठी सिडकोकडून भूखंड मिळावा म्हणून गेले सहा महिने सुरु असलेला वाद अद्याप संपुष्टात आला नसला तरी पनवेलचे महापौर व महापालिका आयुक्तांना निवासस्थानासाठी भूखंड देण्याची प्राक्रिया सिडकोने सुरु केली आहे. खारघर सेक्टर-5 येथे 1800 चौ. मि. क्षेत्रफळाचा भूखंड 2 कोटी 18 लाख रुपयांच्या किंमतीत महापौर निवासासाठी तर पनवेल महापालिका आयुक्तांसाठी 2500 चौ. मी. भूखंड सेक्टर-21 खारघर येथे 3 कोटी 2 लाखात देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सदर रक्कम भरण्याबाबतचे पत्र पनवेल महापालिका आयुक्तांना पाठविण्यात आले आहे. 

काही दिवसांपूर्वी राज्य मंत्री तथा रायगडचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी मंत्रालयात आयोजित केलेल्या बैठकीत पनवेल महापालिकेला देण्यात येणारे सार्वजनिक सोयी सुविधांच्या भूखंडासह महापालिका मुख्यालय, महापौर निवास व आयुक्त निवासासाठी आवश्यक असलेले भूखंड तीन महिन्यात देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याअनुषंगाने सिडको व्यवस्थापनाने पनवेल महापालिका क्षेत्रात सिडको अखत्यारित असलेल्या मोकळ्या भूखंडाची चाचपणी करुन पनवेल महापालिकेला सामाजिक सोयीसुविधांचे एकूण सुमारे 400 भूखंड देण्याचे निश्चित केले आहे. 

पनवेल महापालिका स्थापन झाल्यापासून सार्वजनिक सोयीसुविधांचे भूखंड मिळावेत म्हणून पनवेल महापालिका प्रशासन आणि पनवेलचे लोकप्रतिनिधी सिडकोकडे सारखा तगादा लावत होते. 

अखेरीस काही दिवसांपूर्वी पालकमंत्र्यांनी बोलविलेल्या बैठकीत पनवेल महापालिकेला द्यावयाच्या भूखंडांवर निर्णय घेण्यात आला. अखेर पनवेलचे महापौर व महापालिका आयुक्तांना देण्यात येणाऱया भूखंडांसह प्रभाग कार्यालयासाठी एक भूखंड निश्चित करण्यात आला असून त्याकरिता 2 कोटी 51 लाख रुपये पनवेल महापालिकेला आकारले आहेत. याशिवाय पनवेल महापालिकेला दैनंदिन बाजारासाठी सिडकोने प्रथमच 17 भूखंड खारघर येथे वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे.