Breaking News
उर्वरित कामाला गती देण्याचे आयुक्तांचे निर्देश
एकाच इमारतीत बसस्थानक व तरणतलावासह आंतरक्रीडा संकुल
नवी मुंबई ः कोव्हीड कालावधी तसेच पर्यावरण विभागामार्फत ना हरकत प्रमाणपत्र मिळण्यास झालेल्या विलंबामुळे वाशीतील बसस्थानक व तरणतलावासह आंतरक्रीडा संकुल कामात विलंब झाला. मात्र आता अडचणी दूर झालेल्या असून योग्य प्रकारे कामाचे नियोजन करून त्या दृष्टीने मनुष्यबळ व यंत्रणेमध्ये वाढ करून विहित मुदतीत गुणवत्ता राखून काम पूर्ण करण्याचे निर्देश पालिका आयुक्तांनी दिले आहेत.
वाशी सेक्टर 12 येथील भूखंड क्रं. 196 व 196 ए येथे नवी मुंबई महापालिकेच्या वतीने बांधण्यात येत असलेल्या एनएमएमटी बस स्थानक, वाणिज्य संकुल, आंतरक्रीडा संकुल व ऑलिपिक आकाराच्या जलतरण तलाव बांधकामाची प्रत्यक्ष पाहणी करताना आयुक्तांनी कामाला गतीमानता देण्याचे निर्देश अभियांत्रिकी विभागाला दिले. 9246.13 चौ.मी.च्या भूखंडावर 11652.97 बांधकाम क्षेत्रफळात आठ मजली बहुउपयोगी इमारत उभारली जात असून तळमजल्यावर आठ बस थांब्यांचे बस स्थानक, 2 बसमार्ग, 4 बसेससचे इलेक्ट्रिक चार्जींग स्टेशन, 18 चारचाकी वाहनतळ, तसेच 2 एनएमएमटी कंट्रोल रूम, नागरिकांसाठी फुट कोर्ट व स्वच्छता गृह अशी बहुविध व्यवस्था असणार आहे.
या इमारतीच्या तळमजल्यावर तसेच पहिल्या मजल्यावर 11 शोरूमची व्यवस्था असून वाहनतळही असणार आहे. दुसऱ्या मजल्यावर वाहनतळासह फिल्टरेशन प्लांट व बॅलेन्सिंग टँकची व्यवस्था असणार आहे. तिसरा मजला नागरिकांच्या विविध क्रीडा प्रकारांसाठी उपलब्ध करून दिला जाणार असून त्यामध्ये स्क्वॅश कोर्ट, योगा रूम, स्पोर्ट्स हॉल अशा सुविधा असणार आहेत. या मजल्यावरही वाहनतळ सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. चौथ्या मजल्यावर ऑलिंपिक आकाराचा 25 मी 50 मी जलतरण तलाव सुविधा असणार असून हा नवी मुंबईतील सर्वात मोठा जलतरण तलाव असणार आहे. याव्दारे नवी मुंबईतील जलतरणपट्टूंना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील जलतरण स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी सराव करता येणार आहे. या मजल्यावर जलतरण तलावाप्रमाणेच कॅफेटेरिया, जीम, मेडिटेशन रुम, कॉश्च्युम रुम, व्हिआयपी लाँज, डेक, शॉवर रुम, चेंजींग रुम यादेखील पूरक सुविधा असणार आहेत. या मजल्यावरही वाहनतळ असणार आहे. पाचव्या मजल्यावर आंतरक्रीडा संकुल रचना, योगा रुम, संमेलन कक्ष, क्रीडा सभागृह तसेच 450 आसन व्यवस्थेचे स्टेडियम असणार आहे. सहाव्या व सातव्या मजल्यावर विविध कार्यालयांसाठी केबीन्स उपलब्ध असणार आहेत. तसेच आठव्या मजल्यावर बेन्क्वेट हॉलची व्यवस्था उपलब्ध करून दिली जाणार आहे. या सर्व मजल्यांवर अत्याधुनिक स्वरुपाची स्वच्छतागृहे सुविधा असणार आहे. तसेच या अद्ययावत इमारतीमध्ये 398 चार चाकी व 155 दुचाकी वाहनतळांची व्यवस्था आहे. या सर्व बाबींची बारकाईने माहिती घेत आयुक्त राजेश नार्वेकर यांनी बांधकाम सुरु असताना त्रयस्थ तपासणी संस्था म्हणून काम पाहणाऱ्या आयआयटीच्या तज्ज्ञ व्यक्तींनी सूचित केलेल्या सूचनांचे पालन करावे असे निर्देशित केले. सद्यस्थितीत 45 टक्क्याहून अधिक काम झालेले असल्याचे पाहून उर्वरित काम जलद पूर्ण करण्याचे व ते करताना गुणवत्तेत कुठल्याही प्रकारची तडजोड न करण्याचे आयुक्तांनी सूचित केले.
बांधकाम सुरु असतानाच इमारतीमधील कार्यालये भाडेतत्वावर देणेसाठी समन्वयक सल्लागार नेमणेबाबत आवश्यक मंजूरीची कार्यालयीन प्रक्रिया समांतररित्या सुरु करावी जेणेकरून सदर इमारत लगेच वापरात येईल असे निर्देश देत आयुक्तांनी याबाबतचा प्रस्ताव सादर कऱावा अशा सूचना अभियांत्रिकी विभागाला दिल्या. त्याचप्रमाणे याठिकाणी इमारत तयार झाल्याबरोबर विविध खेळांसाठी ती वापरात यावी यादृष्टीने क्रीडा विभागाशी समन्वय साधून त्यांना खेळांसाठी आवश्यक सुविधा खेळांच्या निकषानुसार उपलबध करून द्याव्यात तसेच याठिकाणी स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज् सुरु होतील याकडे लक्ष देण्याचेही आयुक्तांनी निर्देश केले. हा प्रकल्प जलद व गुणवत्तापूर्ण रितीने पूर्ण करून लवकरात लवकर कार्यान्वित व्हावा यादृष्टीने कामाला गती द्यावी असे निर्देश आयुक्त नार्वेकर यांनी याप्रसंगी दिले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai